– ‘सेसना १७२ आर विमान’ नव्याने सेवेत रुजू
नागपूर :- ‘सेसना १७२ आर’ या प्रशिक्षू विमानास विभागीय आयुक्त तथा नागपूर फ्लाईंग क्लबच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज हिरवा झेंडा दाखवीला. आता हे विमान फ्लाईंग क्लबच्या ताफ्यात प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील फ्लाईंग क्लबच्या हँगरमध्ये आयोजित या कार्यक्रमास उपायुक्त तथा फ्लाईंग क्लबच्या व्यवस्थापकीय संचालक दिपाली मोतीयाळे, उप मुख्य उड्डाण आदेशक कॅ. एस. इझीलारासन उपस्थित होते.
आयुक्त बिदरी यांनी ‘सेसना १७२ आर’ विमानाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी फ्लाईंग क्लबच्या हँगरला भेट दिली. त्यांनी येथील प्रशिक्षण केंद्र, विमान दुरुस्ती विभाग आदींची पाहणी केली.
नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) २० आणि खाजगी २० असे एकूण ४० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण कालावधीमध्ये नियोजित उड्डाणतास पूर्ण करण्याकरिता फ्लाईंग क्लबच्या ताफ्यात एकूण चार प्रशिक्षू विमान आहेत. यापैकी तीन विमाने ही दोन आसनी आहेत. तर ‘सेसना १७२ आर विमान’ चार आसनी आहे. २०१७ पासून तांत्रिक अडचणीमुळे विमान सेवेत नव्हते. तांत्रिक अडचणी दूर होऊन आजपासून हे विमान फ्लाईंग क्लबच्या सेवेत पुन्हा रुजू झाले आहे.
नागपूर फ्लाईंग क्लब हे राज्य शासनाच्या मालकीचे असून याद्वारे विदर्भ व मध्य भारतातील विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. या क्लबद्वारे परवडणाऱ्या दरात प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येते. या संधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बिदरी यांनी केले आहे.