– वनामती येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाद्वारे दूरदृश्य प्रणालीने सहभाग
नागपूर :- पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत डिसेंबर 2024 ते मार्च 2025 कालावधीतील 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दिनांक 24 रोजी दुपारी 1.30 वा. बिहार राज्यातील भागलपूर येथील समारंभाद्वारे वितरीत होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोहास नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. हा राज्यस्तरीय समारोह नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
केंद्र शासनाने शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी 6 हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात. पीएम किसान योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात यापुर्वी एकूण 18 हप्त्यांमध्ये सुमारे 33 हजार 565 कोटी रुपयांचा लाभ जमा झालेला आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थीना भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँकखाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी आवश्यक केलेल्या आहेत.
राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक 24 फेब्रुवारी, 2025 रोजी सुमारे रुपये 1967 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. राज्य शासनामार्फत नमो किसान सन्मान योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर तीमाहीस 2 हजार रुपये रक्कमेचेही वितरण करण्यात येते.
राज्यातील प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर हा समारोह आयोजित करण्यात येत आहे. सदरहू समारंभाच्या वेळी प्रगतशील शेतकरी कृषी शास्त्रज्ञ, निमंत्रित मान्यवर, तसेच शेतकरी यांच्या उपस्थितीत चर्चासत्र, प्रदर्शने, विविध योजनांची माहिती व लाभ वितरण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यात वेगाने सुरु असलेल्या अग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी माहिती संच तथा फार्मर आयडी बनविण्यासाठीची नोंदणी नागरी सुविधा केंद्रांवरुन करण्यात येत आहे. या ठिकाणांवरुनही या समारोहाचे थेट प्रक्षेपणामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होता येईल.
या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरून होणार आहे. लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी केले आहे.