– ग्रामायण प्रतिष्ठानच्या ६व्या ग्रामायण उद्यम प्रदर्शनाचा समारोप
नागपूर :- बल, शील, पूजा, धैर्य, युक्ती, बुद्धी, दृष्टी, आणि दक्षता या आठ गुणांची जोपासना प्रत्येकाने आपल्या घरात केली पाहिजे. या गुणांसोबतच दुर्गुणांचा त्याग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भय, स्वार्थ, अहंकार, आळस, चुकीच्या सामाजिक मान्यता, आणि बौद्धिक जडता. हे दुर्गुण जर आपण आपल्या घरातून दूर केले, तर आपले कुटुंब खऱ्या अर्थाने समर्थ कुटुंब बनेल. समर्थ कुटुंब व्यवस्थेची सुरुवात हे ग्रामायणाच्या या प्रक्रियेत पहिले पाऊल ठरेल, असे प्रतिपादन कुटुंब प्रबोधन गतिविधी, रा.स्व. संघाचे अ.भा प्रमुख रवींद्र जोशी यांनी केले.
अमृत भवन, आंध्र असोसिएशन परिसर, उत्तर अंबाझरी मार्ग, झांशी राणी चौकाजवळ, नागपूर येथे आयोजित ग्रामायण प्रतिष्ठानच्या ६व्या ग्रामायण उद्यम प्रदर्शनाचा समारोप सोमवारी (२० जानेवारी) पार पडला. यावेळी ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता व कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी. भरतिया, राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास, ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत रागीट यांची उपस्थिती होती.
कुटुंब प्रबोधन गतिविधी, रा.स्व. संघाचे अ.भा प्रमुख रवींद्र जोशी पुढे म्हणाले, भारताकडून नवीन प्रकाश मिळेल, जीवनातील अंधकार दूर होईल, आणि सगळ्यांचे जीवन सुखी, संपन्न व सार्थक बनेल, अशी आशा जग बाळगून आहे. या जीवनमूल्यांना रुजवण्यासाठी आणि या उपक्रमाला ग्रामीण भागातून पाठबळ मिळावे, अशी प्रेरणा समाजाला आपण द्यायला हवी. आपल्या सर्वांना या कार्यासाठी एकत्र येऊन प्रेरणा घ्यावी, हीच माझी अपेक्षा आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे ही एक उल्लेखनीय
ग्रामायणमध्ये विविध प्रॉडक्ट्स आणि सेवा उपलब्ध आहेत. या कार्यक्रमांद्वारे सहभागी व्यक्ती एकमेकांशी अनुभव शेअर करू शकतात. तज्ज्ञांद्वारे नवीन तंत्रज्ञानाविषयी शिकण्याची संधीही उपलब्ध आहे. आम्ही प्रॉडक्टच्या विक्रीपासून ते गुणवत्ता आणि ब्रॅंडिंगपर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहेत. प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे, असे प्रतिपादन राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांनी केले.
रोजगारनिर्मिती आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे गरजेचे
आपल्या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था सध्या शहरातील उपभोक्तावादी दृष्टिकोनावर अवलंबून आहे. परंतु, या चुकीच्या दृष्टिकोनामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावत नाही ना, याचा विचार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाचे महत्त्व समजून घेणे अत्यावश्यक आहे, कारण जोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था उभारी घेत नाही, तोपर्यंत देश प्रगती करू शकणार नाही. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, उत्पादनांची विक्री, आणि आर्थिक सक्षमता यांची पूर्तता झाली पाहिजे. सध्याची परिस्थिती अशी आहे की रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील लोक शहरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शहरांमध्ये लोकसंख्या वाढत आहे, आणि त्यातून अनेक समस्या उद्भवत आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी केले.
या समारोपीय सोहळ्यादरम्यान अर्धशतकाहून अधिक काळ सहजीवनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या ३५ दाम्पत्यांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार करण्यात आला. पिढीजात व्यवसाय टिकवून ठेवण्याऱ्या आणि पारंपरिक उद्योग करणाऱ्या ५ कुटुंबांचा गौरव यावेळी झाला. यात देशमुख ट्रेडिंग कंपनीचे प्रभाकर शंकरराव देशमुख, साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद राजाभाऊ कुलकर्णी, सराफा व्यवसायीक पुरुषोत्तम हरिभाऊजी कावळे, वाघमारे मसालेचे प्रकाशजी वाघमारे, एमआयडीसी बुटीबोरी येथील उद्योजक श्रेयस राजू भावे यांचा समावेश आहे.
यावेळी उमा गंगाधर पिंपळकर आणि चंद्रकांत देव या दोन सेवाव्रतींचा सामाजिक योगदानाबद्दल ग्रामायण ज्येष्ठ समाजयोद्धा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. उमा गंगाधर पिंपळकर यांनी जनसंघाच्या कार्याला सुरुवात केली आणि त्या नंतर त्यांनी भाजपच्या दक्षिण नागपूर उपाध्यक्ष, दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष, नागपूर नगर महिला अध्यक्ष, अखिल भारतीय परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य, आणि ज्येष्ठ आघाडी महामंत्री अशा विविध पदांवर कार्य केले. आपल्या कार्यकाळात, त्यांनी अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. आणीबाणीच्या काळात 28 वर्षांपूर्वी बाबरी मशीद पाडली गेली, त्यावेळी कारसेवकांमध्ये त्यांनी भाग घेतला. चंद्रकांत देव यांचा जन्म 1949 मध्ये झाला. त्यांचे शिक्षण बीएससी आहे आणि त्यांनी आयकर विभागात आयकर अधिकारी म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्यांनी जनसंघात दाखल होऊन जिल्हा कार्यवाह आणि प्रांत कार्यालय मंत्री म्हणून कार्य केले. नंतर ते राष्ट्रीय महामंत्री झाले. सध्या ते विदर्भ प्रांत आणि कल्याणी आश्रमचे अखिल भारतीय सदस्य आहेत.
२०१२ पासून ग्रामीण भागातील उपक्रम, पर्यावरणपूरक प्रकल्प आणि सामाजिक सेवेत सक्रिय असलेल्या ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे हे प्रदर्शन भरवले जाते. प्रदर्शनात ग्रामीण व स्थानिक उत्पादने, सेंद्रिय शेतीतील उत्पन्न, पारंपरिक वस्तू, बचत गटांचे उपक्रम, आणि स्वनिर्मित वस्तूंचा समावेश होता.
याशिवाय कौशल्य विकास कार्यक्रम, नाविन्यपूर्ण स्पर्धा, CSR प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होटे. कला दालनात बांबू आर्ट, गोंडी आर्ट, मातीच्या कलाकृती, आणि कचऱ्यातून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरल्या. ई-वेस्ट कलेक्शन प्रकल्पांतर्गत जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू संकलन करणे, सरकारी योजना व उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स इथे होते. त्याचा नागपूरच्या नागरिकानी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले, आभार प्रशांत बुजोणे यांनी मानले.