देव, देश आणि धर्मासाठी झटणारा, स्वातंत्र्ययोद्धा आणि संस्कृती रक्षक असा ज्यांचा पूर्वेतिहास आहे, अशा भटके-विमुक्त समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न, १९९१ मध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी केला. या भटके समाज बांधवाना यथोचित सन्मान मिळावा यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात.
“चलो जलाये दीप वाह, जहा अभि अंधेरा है”.
या परम पवित्र भारत मातेला जर वैभवाच्या शिखरापर्यंत न्यायचं असेल तर, पोटाला कोरभर तुकडा मिळविण्यासाठी दगड फोडणारे, नाचणारे गाणारे, कसरत करणारे, अर्धनग्न अवस्थेत असणारे पुरुष आणि त्यांच्या पायाला घोटणारी, खांद्यावरच्या झोळीत लटकणारी कुपोषित बालकं. नेहमीच उपेक्षित अशा या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. या समाजाला सन्मानाचे जगणे मिळवून देण्यासाठी भटके-विमुक्त विकास परिषदेची पायाभरणी झाली. भटक्या विमुक्तांसह अवघा हिंदू समाज संघटीत झाला पाहिजे. या समाजातला प्रत्येक घटक बलशाली झाला पाहिजे.
भटके-विमुक्त विकास परिषद गेली अनेक वर्ष समाजापासून दुरावलेल्या, कधी काळी चोर लुटेरे म्हणून हिणवल्या गेलेल्या, दुखावल्या गेलेल्या, आपल्याच समाज बांधवांसाठी कार्य करीत आहे. परिषदेच्या स्वयंसेवकानी स्वत:ला या कार्यात झोकून दिले आहे. भटके विमुक्त बांधवांची आणि त्यांच्या विकासाची कास धरलेल्या स्वयंसेवकांनी संपर्क, भेटीगाठी, भाऊबीज, अशा लहान-लहान कार्यक्रमांमधून भटक्यांच्या पालावर राबता वाढविला आणि खऱ्या अर्थाने या भटके-विमुक्त समाज बांधवांसाठी सेवा कार्य सुरु झाले. “भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदे” च्या माध्यमातून भटके समाज बांधवांच्या वस्तीवर जावून त्यांच्या समस्या जाणून घेणे, वस्तीतील समाज बांधवांसोबत राहून त्यांना समजून घेणे, त्यांना मदतीचा हात देणे, यातूनच एक भावनिक नाते हळूहळू दृढ होत गेले. आज या कार्याला एक मूर्त स्वरूप यायला लागलं आहे. परंतु हे कार्य करत असताना प्रत्येक वेळी स्वयंसेवकांच्या मनात हाच भाव आहे की, पाल टाकून उघड्यावर राहणारी “ही माणसं” माझी आहेत. ते आमच्या कुटुंबाचा एक घटक आहेत. हा भाव समोर ठेवून आज कार्य प्रगतिपथावर आहे.
“बंधू भाव हाच धर्म “ हे ब्रीद घेवून आपल्या या दुर्लक्षीत व उपेक्षीत लहान जाती समूहातील समाज बांधवाना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी प्रयत्नरत आहे. सामान्यत: त्यांना न्याय्य हक्क मिळवून देवून मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्या या भटके विमुक्त कल्याणकारी परिषदे मार्फत केला जात आहे. समाज बांधवांसाठी “भटके विमुक्त कल्याणकारी परिषद” एक आधारवड आहे.
“सब समाज को लिये साथ मे, आगे है बढते जाना”. आपल्या विदर्भात नाथजोगी, बहुरूपी, बेलदार, पांगुळ, कैकाडी, नंदीवाले, वैदू, वडार, गोसावी, गोपाळ, मांग-गारुडी, गोंधळी, वासुदेव, ओतारी, धनगर, वंजारी, सरोदे-जोशी, नंदीबैलवाले, पारधी, सोनझारी, मसणजोगी, चित्रकती, लोहार,काशीकापडी, मसनजोगी, बंजारा समाज बांधव वास्तव्याला आहेत. त्यांच्यासाठी भटके विमुक्त कल्याणकारी परीषद, विदर्भ प्रदेश विविध उपक्रमांद्वारे कार्यरत आहे.
ही परिषद शिक्षण, महिला सशक्तीकरण, स्वावलंबन(रोजगार), आरोग्य, सन्मान आणि समस्या निवारण या सहा आयामांवर कार्य करते.
आमच्या या भटके समाज बांधवांसाठी “बिऱ्हाड परिषद” हे एक स्नेहमिलनच.
२०१० पासून दर दोन वर्षांनी “ बिऱ्हाड” परिषदेचे आयोजन केले जाते.
आजपर्यंत एकंदर सहा बिऱ्हाड परिषदांचे आयोजन करण्यात आले. भटके बांधव आपापली बिऱ्हाड घेवून परिषदेच्या ठिकाणी येतात. दोनदिवस छांन आनंद उपभोगतात. बिऱ्हाड परिषदेला दूरवरून, विदर्भातून, सारे भटके समाज बांधव एकत्र जमतात.
अस्तित्वा करिता भटके समाज बांधवांनी एकत्र येणे, संवाद घडवून आणणे आणि समाजाच्या रिती-भातीची माहिती या भटक्यांना व्हावी, मुख्य प्रवाहासोबत त्यांना जुळवून घेता आलं पाहिजे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश. याच समाजातून पुढे चांगलं शिक्षण घेवून, उच्च पदांवर असणाऱ्या अधिकारी, खेळाडू, उद्योजक, यांचं मार्गदर्शन या बिऱ्हाड परिषदेत उपस्थित समाज बांधवांना लाभते. दोन दिवसांच्या या निवासी बिऱ्हाड परिषदांची वाट आपले हे समाज बांधव बघत असतात. ही बिऱ्हाड परिषद दर दोन वर्षांनी होत असते.
दि. २० व २१ फेब्रुवारी २०२५ ला नागपूर येथील गिट्टीखदान भागात असलेल्या मैदानावर भटके-विमुक्त कल्याणकारी परिषद, विदर्भ प्रांत द्वारा आयोजीत “बिऱ्हाड परिषद” अतिशय व्यवस्थीत आणि नीटनेटकी पार पडली.
या बिऱ्हाड परिषदेला विदर्भातील सर्वच म्हणजे अकराही जिल्ह्यातून भटके-विमुक्त समाज बांधवांनी ह्जेरी लावली होती. हजाराच्या संखेत एकत्र आलेल्या या एकवीस जातीच्या भटके-विमुक्त समाज बांधवांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होवून आनंद लुटला.
वेगवेगळ्या गावागावाहून आलेले भटके समाज बांधव, ज्यांची भाषा वेगळी, राहणीमान वेगळे, व्यवसाय वेगळा असलेले जवळपास तीनशे पन्नास बिऱ्हाडे आली होती. आबाल-वृद्धांची संख्या तेराशे सत्तावीस अशी होती.
दोन दिवशीय बिऱ्हाड परिषद ज्या भागात आयोजीत केली होती त्या परिसराला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परिसर“ असे नाव देण्यात आले होते. या निमित्ताने उपस्थित सर्व भटके समाज बांधवांना अहिल्या देवी होळकर यांचे नाव महित झाले तसेच त्यांची तीनशेवी जयंती आहे हे सांगण्यात आले.
या बिऱ्हाड परिषदेला अखिल भारतीय घुमंतू कार्यप्रमुख दुर्गादास व्यास पूर्ण वेळ उपस्थित होते.
भव्य मंचावर विदर्भातील भटक्या समाज बांधवांचे प्रतिनिधित्व करणार्या समाज बांधवांचे चित्र असणारा फलक सर्वांचे लक्ष विधून घेत होता.
सत्तावीस फुट उंच धर्म ध्वजाची स्थापना करून बिर्हाड परिषदेची सुरवात झाली.
एका स्वतंत्र दालनात भव्य दिव्य अशी प्रदर्शनी लावण्यात आली होती. भटके विमुक्त समाज आतील क्रांतिवीर, नायक यांची छायाचित्रांसह सविस्तर माहिती असलेले मोठे फलक लावलेले होते. भटके समाज बांधवांचे भावविश्व दाखविणारे तसेच भटके-विमुक्त कल्याणकारी परिषदेचे आजवरचे कार्य, उपक्रम व वाटचाल दाखविणारी छायाचित्रे प्रदर्शित केली होती. पाथरवट समाजाने तयार केलेल्या दगडाच्या मूर्ती व साहित्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
भटक्या समाजातील तरुणांनी तयार केलेल्या ढोलताशा पथकाने मान्यवरांचे स्वागत केलं.
भारतमातेच्या पूजनाने उद्घाटन सत्राला प्रारंभ झाला. या वेळी परिषदे तर्फे चालविल्या जाणाऱ्या “पालावरची शाळा”च्या विद्यार्थ्यांनी भगवत गीतेचा पंधरावा अध्याय मुखोद्गत सादर केला. सर्वांनी खूप कौतुक केले.
भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, यांचे व्हिडीओद्वारा शुभेच्छा संदेश प्रसारित करण्यात आले. थोर साहित्तिक आणि भटके समाज बांधवांच्या समस्यांना वाचा फोडणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे प्रसारण झाले.
या प्रसंगी, आपल्या भटके विमुक्त कल्याणकारी परिषदे मार्फत प्रयागराज येथील कुंभमेळ्यात विदर्भाचे भटक्या समाज बांधवांचे प्रतिनिधित्व करणारे योगेश्वर पुरी महाराज आणि मेहकरचे समाधान गुऱ्हाळकर महाराज यांचा सत्कार व गौरव करण्यात आला.
गौरव मूर्ती म्हणून भटकेविमुक्त समाजातीलच शिक्षित आणि होतकरू मान्यवरांसोबतच विविध क्षेत्रात नाव लौकिक मिळविलेले उद्योजक, इंजिनिअर, डॉक्टर, कीर्तनकार तसेच आपली कला अजूनही जोपासून ठेवलेल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. अशा सन्माननीय व्यक्तींचा शाल-स्मृतीचिन्ह आणि गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला. ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात नावाजलेली आहेत. परंतु समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्यात आहे म्हणूनच ते दोन्ही दिवस पूर्ण वेळ कार्यक्रमात उपस्थित होते.
“भटके विमुक्त हे हिंदू संस्कृतीचे वाहक आहेत”, “भटके विमुक्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील”, “भटके जाती जमातीच्या लोकांना शिक्षणाद्वारे त्यांच्या परंपरागत कौशल्यांची गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे”, भटके समाज बांधवांसाठी कृती आराखडा तयार करून प्रत्येक जिल्हा स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करून विविध शिबिरांच्या माध्यमातून या भटके जाती जमातीच्या शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या समस्या सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन कार्यक्रमात सहभागी अतिथीनी केले.
नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच नागपूर महानगर पालिका आयुक्त यांनी आवर्जून या बिऱ्हाड परिषदेला भेट दिली. त्यांचे हस्ते, भारतमातेची आरती करण्यात आली. भारत मातेच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला. परिषदेला भेट देणाऱ्या सर्वच मान्यवरांनी, या परिसरात उभारलेल्या बिऱ्हाडाचे/पालांचे अवलोकन केले. या बिर्हाडात परिषदेत वेगवेगळ्या जिल्ह्यांनी आपापल्या जिल्ह्यांचे वैशिष्ट्य दर्शविणारे तसेच तेथील प्रमुख दैवत आणि तेथील जाती समूह यांचे फलक लावले होते, हे विशेष.
या बिऱ्हाड परिषदेत विविध सत्रातून आपल्या भटके समाज बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या. जातप्रमाणपत्र, घरकुल यावर सविस्तर चर्चा झाली. तरुण मांडली त्यात प्रामुख्याने सहभागी झालेत.
रात्री भोजनोत्तर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरवात झाली. परिषदेला उपस्थित कलाकारांनी आपली कला सादर केली. यात बहुरूपी, गोंधळी, वडार, मसनजोगी, गोपाळ समाज बांधवांनी आपापल्या वेशभूषेत येवून सर्वांचे मनोरंजन केले. गोपाळ समाज बांधवांनी विविध कसरती करून आपल्या पारंपारिक व्यवसायाची चुणूक दाखवून दिली.
तयार केलेल्या बिऱ्हाडात, रात्री सर्वांनी विश्रांती घेतली.
२१ फेब्रुवारीला सकाळी पाच वाजता पासून सर्वांची लगबग सुरु झाली. प्रातर्विधी-स्नानादी आटोपून सर्वांनी आपापल्या बिऱ्हाडांची सजावट केली. देव देवतांची पूजा केली. प्रत्येक बिऱ्हाडावर भगवा ध्वज आणि आंब्याच्या पानांचे तोरण, केळीची खांबे, यांनी सारा परीसर सुशोभित करण्यात आला होता. सगळे दृश्य कसं विलोभनीय. सारे कसे, नटून-थटून तयार होते. मंगल वातावरण निर्माण झाले होते.
ढोलताशा, संबळ, किंगरी, पुंगी अशा वाद्यांच्या गजरात शोभायात्रा मार्गस्थ झाली. दीड किलोमीटरचे अंतर पार करायला एक तासाचा अवधी लागला. शोभा यात्रेत सर्वांनी दोन-दोनच्या रांगेत आपआपली साहित्य घेवून व वेशभूषा करून सर्वांची मने वेधून घेतलीत. गिट्टीखदान परिसरात ही शिस्तीत निघालेली शोभायात्रा कौतुकाचा विषय ठरली.
महिलांसाठी कुटुंब प्रबोधन, तर तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन महाज्योती तर्फे आयोजित केले गेले.
महाराष्ट्र राज्याच्या विविध मंत्री महोदयां सोबत जवळून व समोरासमोर चर्चा करण्याची संधी अनेकांना मिळाली.
भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेतर्फे सातत्याने सरकार दरबारी प्रयत्न करून काहींची जात प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. मंत्र्यांचे हस्ते काही विद्यार्थ्यांना जात-प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
उपस्थीत सर्व समाजबांधवांच्या साक्षीने मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले. भटके जाती जमातीच्या लोकांना जात व जातवैधता प्रमाणपत्र देण्याच्या अटींमध्ये शिथिलता देवून, गावकुसाबाहेर राहणाऱ्या कुटुंबाना पक्की घरे बांधून द्यावीत, अत्यावश्यक असलेली शासकीय प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत असा ठराव पारित करण्यात आला. त्याची प्रत मंत्री महोदयांना देण्यात आली.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संपूर्ण भारतातून आलेले भटक्या समाज बांधवांचे निवडक प्रतिनिधी दोन्ही दिवस उपस्थित होते.
बिर्हाड परिषद ही केवळ विदर्भातच आयोजित केली जाते, हे उल्लेखनीय आहे.
सर्वांना पंक्ती भोजन झाले. सामाजिक समरसतेचा भाव सर्वजण अनुभवीत होते.
दोन्ही दिवस आरोग्य शिबीर लावण्यात आले होते. महाज्योती तर्फे युवकांसाठी मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले होते.
ही बिर्हाड परिषद “पर्यावरण पूरक” ठरली. बिर्हाड परिषदेत सहभागी झालेल्या बिर्हाड परिषदेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला, एक शबनम/पिशवी व त्यात स्टीलचे ताट+पेला देण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला. नागपूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या “सेवा विभागा” आणि परिसरातील वडार वस्तीतील सर्वां समाज बांधवांचे शेकडो हात या बिऱ्हाड परिषदेच्या यशस्वितेसाठी कार्यरत होते.
आलेल्या सर्व मंत्री महोदयांनी या भटके समाज बांधवांची दखल घेतली आहे हे या परिषदेचे फलित म्हणावे लागेल.
भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, सर्वच भटके समाज बांधवांसाठी कार्य करते, सर्वांना एका छताखाली आणते हे सगळ्यांसाठीच नाविन्यपूर्ण होते. एवढ्यामोठ्या प्रमाणात हा भटका समाज बांधव शंभर दोनशे कि.मी. अंतर पार करून बिऱ्हाड परिषदेला येतो. तिथे आपल्या कुटुंबासाठी पन्नास रुपये नोंदणी शुल्क भरतो, शिस्तीत आपापली पाल टाकतो. पालावरच्या शाळेत जाणारी नीटनेटकी पोर, मंत्री महोदयांच बिऱ्हाडातच औक्षण करून स्वागत करतात, व्यासपीठावर सहज वावरणारे आपल्यातीलच कार्यकर्ते. प्रत्येक वक्त्याला शांततेने ऐकून घेणारा आणि तितक्याच आत्मीयतेने किंबहुना आक्रमकतेने आपल्या व्यथा समोर मांडणारा हा हजाराहून अधिक संखेने उपस्थित समाजबांधव. खरोखरीच अवर्णनीय आणि अकल्पनीय असेच सारे.
या बिऱ्हाड परिषदे दरम्यान भटक्या समाज बांधवांनी दाखविलेली शिस्त आणि स्वच्छता कौतुकास्पद आहे.
“आमचे बिर्हाड- हेच आमचे तीर्थ- हाच आमचा महाकुंभ” अशी भावना काहींनी व्यक्त केली.
“आम्हाला मुख्य प्रवाहात सामावून घ्यावं” अशी साद घालत, भटक्या समाज बांधवांची पावलं आपापल्या पालावर परतली.
समाज आणि शासन यांतील दुवा म्हणून, भटके विमुक्त कल्याणकारी परिषद सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कार्यरत आहे. “बिऱ्हाड परिषद” हे त्याच उदाहरण.
“माणुसकीच्या धर्माला” जागवणारी ही बिर्हाड परिषद “पंच परिवर्तनाची” नांदी ठरावी.
– श्रीकांत भास्कर तिजारे,भंडारा