ठाणे :- ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री डॉ. बालाजी किनीकर, किसन कथोरे, कुमार आयलानी, मनीषा कायंदे, रवींद्र फाटक, अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन शहराचा विकास करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी येथे राम मंदिराची निर्मिती करून अनेक वर्षांचे स्वप्न साकार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.