“शासन आपल्या दारी” उपक्रमातून राज्यात अनेकांना विविध योजनांचा फायदा झाला. प्रत्येक जिल्हयातून 75 हजार लोकांना खरेतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लाभ वितरीत करण्याचा राज्य शासनाचा उपक्रम होता. मात्र आत्तापर्यंत प्रत्येक जिल्हयाने आपले उद्दीष्ट पुर्ण करून पुढे जात उत्कृष्ठ कामगिरी केली. शासन आपल्या दारी अभियानाचे संपुर्ण राज्यात आत्तापर्यंत 36 कार्यक्रम झाले, यातून 1 कोटी 68 लाखांहून अधिक लाभार्थींना लाभ मिळाला आहे. यात कोल्हापूर जिल्हयाने 1 लाख 58 हजार लाभार्थ्यांना लाभ वितरीत केला. यातील काही लाभार्थ्यांनी त्यांना झालेला अतीव आनंद आपल्या प्रतिसादात सांगितला. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व विविध शासकीय विभागांचे आभार मानले.
भाग्यश्री अभय आवळेकर यांचा उद्योग शिरोली, कोल्हापूर येथे आहे. त्या म्हणतात, माझा फाउंड्रीला लागणारे टूल्स आणि पॅटर्न्स बनवण्याचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी मला कर्ज आवश्यक होते. शासन आपल्या दारी उपक्रमाबद्दल माहिती मिळाली, त्यासाठी मी बँकेत गेले, बँकेकडून मला मुख्यमंत्री रोजगारी निर्मिती कार्यक्रमाची माहिती मिळाली आणि मी लगेचच उद्योग भवनाशी संपर्क साधला. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मला खुप चांगले सहकार्य केल्यामुळे मी कागदपत्रांची पूर्तताही लगेच केली. उद्योगाचे नोंदणीही केली आणि माझ्या उद्योगास सुरुवात केली. मला बॅँकेने लगेच कर्ज़ मंजूर करून दिले. शासनाचे जे अनुदान आहे ते सुद्धा मला मिळाल्यामुळे माझ्या व्यवसायाला अर्थिकदृष्ट्या चालना मिळाली. सध्या माझ्या व्यवसायात मदतीला एकूण 12 कामगार काम करत आहेत़. माझी वर्षाची उलाढाल ही 60 लाखापर्यंत गेली. आणि पुढीही माझा व्यवसाय वाढवण्याचा माझा मानस आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत या योजनेचा मला लाभ घेता आला आणि त्यासाठी मी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगारी निर्मिती कार्यक्रमातील विभागाची शतश: ऋणी आहे.
नेताजी अंगज, भावश्री आश्रम शाळा, चिमगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. इतर मागास बहुजून कल्याणांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जाती प्रवर्गातील मुलांच्या कल्याणासाठी 23 मे 2023 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला शासनाच्या वतीने टॅब वितरीत केलेले आहेत. याबाबत अंगज म्हणतात, टॅब आम्हाला ताब्यात मिळाले असून टॅबचा उपयोग शैक्षणिक वर्ष 2023-24 मधे मुलांच्या शिक्षणासाठी नक्कीच होईल. मुलांचे दर्जेदार व सुलभरितेने शिक्षण व्हावं, त्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळावी या अनुषंगाने शासनाने विजा, भज प्रवर्गातील मुलांना शासन आपल्या दारी कार्यक्रमात टॅबचे वितरण केले. ते टॅब आम्हाला मिळाले असून नक्कीच मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी मदत होईल. यासाठी शासन व समाज कल्याण विभागाकडून आम्हाला सहकार्य मिळाले त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे.
संदेश अशोक पाटील, मुख्याध्यापक राजर्षी छत्रपतीं शाहू माध्यमिक आश्रम शाळा, पाचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर यांना त्यांचे शाळेत शासन आपल्या दारी उपक्रमातून इतर मागास बहूजन विभाग, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आलेले आहे. याबाबत ते सांगतात, सदर टॅब हे उत्तम दर्जाचे असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी खुप फायद्याचे होईल. टॅब मध्ये शैक्षणिक ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही सॉफ्टवेअर आहेत. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी मोठ्या प्रमाणात वाढेल. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाने जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो खूप स्वागताहार्य असल्याचे पाहवयास मिळते. तसेच मी शासनाचे आभार मानतो.
शासन आपल्या दारी योजनेतून आर्थिक सक्षमता मिळाली, हे वाक्य आहे गुजरीतील छोटा व्यवसाय करणाऱ्या अनघा भुर्के यांचे. शासन आपल्या दारी या अभियातनातून त्यांना कसा फायदा झाला, त्याबद्दल त्या सांगतात, भेंडे गल्ली, गुजरी येथे माझा छोटा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करत असताना एका मशीनची आवश्यकता होती. मशीन खरेदी करायचे तर पैसे हवेत. त्यासाठी मी बँकेत गेले. बँकेत गेल्यावर त्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती मिळाली. कोणकोणती कागदपत्रे लागतील याची अगदी योग्य माहिती मिळाली. कर्जासाठी पाठपुरावा केला असता थोड्या दिवसातच व्यवसायाबाबत प्रशिक्षण मिळाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच कर्जही मिळाले व मशीन खरेदी केले. या मशीनमुळे खूप फायदा झाला. माझा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु झाला. आता माझी आर्थिक परिस्थितीही सुधारत आहे. याकामी उद्योग भवनमधील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानते.
करवीर तालुक्यातील गाडेगोंडवाडी गावातील बाबासाहेब विष्णू देवकर यांना शासन आपल्या दारी योजनेंतर्गत शासनाच्या महाडीबीटी अंतर्गत वैयक्तिक कृषि बँक अनुदान योजनेचा लाभ मिळाला. देवकर यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना यापूर्वी व आताही जे लाभ मिळत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार मानून ही निश्चितच स्वागतार्ह उपक्रम असल्याचे सांगितले. ते म्हणाले, वैयक्तिक कृषी बँक अनुदान योजनेंतर्गत एखादा शेतकरी ट्रक्टर व त्याची औजारे खरेदी करुन तो स्वत: ही उपकरणे वापरु शकतो व ही उपकरणे तो कमी भाडेतत्वावर इतरांनाही वापरायला देवू शकतो, अशा पध्दतीची ही योजना आहे. ही योजना ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये कोणताही भेदभाव न होता सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा योग्य फायदा मिळत आहे. याकामी जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहायक गुरव व वर्मा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
शब्दांकन – सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर