संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21 :- नागरिकांची विविध विभागांची प्रलंबित कामे मंडळ स्तरावर मार्गी लावण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्व नागरिकांना देण्यासाठी व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या विविध विभागाच्या प्रलंबित प्रश्नांना एकाच छताखाली जलद गतीने न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम ” मंडळ स्तरावर दर शुक्रवारी राबविण्याचे निर्देशित केल्याप्रमाणे या उपक्रमाची अंमलबजावणी करीत येत्या शुक्रवारी 23 सप्टेंबर ला कामठी तालुक्यातील कोराडी येथील विठ्ठल रुखमाई देवस्थान सभागृहात ‘प्रशासन आपल्या गावी’हा उपक्रम राबविण्यात येणार आहे तेव्हा कोराडी मंडळ अंतर्गत येणाऱ्या नागरिकांनी सदर उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे. तालुकास्तरावरील विविध यंत्रणा अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन नागरिकांच्या विविध अडचणी /समस्या यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर एक दिवस शुक्रवारी उपक्रम राबविण्याचे नियोजित आहे त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारी 23 सप्टेंबर ला प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमात कामठी पंचायत समिती, उप अधीक्षक भूमी अभिलेख,वन परिक्षेत्र अधिकारी नागपूर,तालुका कृषी अधिकारी कामठी, तालुका आरोग्य अधिकारी कामठी, पशुधन विकास अधिकारी कामठी, महिला व बाल विकास अधिकारी कामठी, विस्तार अधिकारी , गटशिक्षण अधीकारी पंचायत समिती कामठी, नायब तहसीलदार (महसूल),(संजय गांधी योजना),निरीक्षक अधिकारी पुरवठा विभाग कामठी, उपअभियंता महावितरण कार्यालय कामठी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कामठी, कोराडी मंडळातील सर्व बँकेचे शाखा अधिकारी,मंडळ अधिकारी कोराडी,पोलीस निरीक्षक कोराडी उपस्थित राहणार आहेत, हे सर्व विभागीय अधिकारी या उपक्रमात एकाच छताखाली उपस्थित राहणार आहेत तेव्हा नागरिकानी उपरोक्त नमूद सर्व विभागाशी निगडित प्रलंबित कामाचा निपटारा या उपक्रमातुन करून घ्यावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.