लोकसंस्कृतीचे विपुल लेखन करणाऱ्या – ताराबाई भवाळकर

21 ते 23 फेब्रुवारीमध्ये दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. मा. प्रधानमंत्री महोदय यांच्याहस्ते संम्मेलनाचे उद्घाटन होणार आहे. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांच्या विषयी घेतलेला हा धांदोळा…….

85 वर्षीय भावलकर यांनी मराठी साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी विविध नाटके, पुस्तके आणि संशोधनात्मक लेख लिहिले आहेत. भावलकर यांनी नऊ वेगवेगळ्या संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले असून मराठी साहित्यासाठी काम करणाऱ्या विविध संस्थामध्ये त्यांनी महत्वाची पदे भूषवली आहेत.

लोकसंस्कृती विषयी विपुल लेखन करणाऱ्या ताराबाई भवाळकर या मुळच्या पुण्याच्या ताराबाईंच्या वडिलांच्या सतत बदल्या होत, त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण एका ठिकाणी होऊ शकले नाही. एस.एस.सी. नंतरचे सर्व शिक्षण त्यांनी नोकरी करून बहि:स्थ पद्धतीने केले. १९६७ साली त्या एम.ए. झाल्या. त्याखेरीज राष्ट्रभाषा पंडित व अनुवाद पंडित या परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या. पीएच.डी.साठी त्यांचा विषय होता ‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण’(प्रारंभ ते १९२०).त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचे पारितोषिक मिळाले.

ज्ञानाच्या आवडीतून त्यांनी अध्यापन हेच क्षेत्र निवडले. १९५८ पासून १९७० पर्यंत माध्यमिक शाळेत शिक्षिका, १९७० पासून १९९९ पर्यंत सांगली येथील श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत राहिल्या. विद्यावाचस्पती (पीएच.डी.) मार्गदर्शक या नात्यानेही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. बृहन्महाराष्ट्रातील अनेक संस्था आणि विद्यापीठातून त्यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. ‘मायवाटेचा मागोवा’ हे पुस्तकही स्त्रीवादी दृष्टिकोनातून संशोधन करणार्‍यांना मूल्यवान संदर्भ म्हणून उपयुक्त आहे.

पारंपरिक, कुटुंबात जन्मलेल्या ताराबाईंनी वस्तुनिष्ठ व यथार्थ चिकित्सक दृष्टी प्रयत्नपूर्वक जोपासून, स्त्री-जीवनाविषयी विशेष आस्थेने, लोकसंस्कृतीचे, लोकसाहित्याचे, लोककलेचे सखोल व व्यापक दर्शन घडविण्यात प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे. त्यांचे बहुतेक लेखन लोकसंस्कृती व नाटक या दोन विषयांवर असून त्यांनी पूर्वसुरींचे संशोधनपर साहित्य अभ्यासले आहे. बालजीवनातल्या समृद्ध अनुभवांची शिदोरी त्यांच्या चांगलीच कामाला आली. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, वि.का. राजवाडे, धर्मानंद कोसंबी, तसेच दुर्गाबाई भागवत, डॉ.रा.चिं. ढेरे प्रभृती महानुभावांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रेरणेचा व मार्गदर्शनाचा ताराबाई कृतज्ञतेने उल्लेख करतात.

‘लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा’ या आपल्या प्रथम पुस्तकाविषयी निमित्त म्हणून आंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्ष १९७५ झाले तरी त्यांना तीव्रतेने जाणवले की, ‘आजवर पारंपरिक स्त्रीविषयी जे लिहिले-बोलले जात आहे, (गेले आहे) त्या सर्वांचे आधार पुरुष लेखकांच्या लेखनात आहेत…. मग खऱ्या अर्थाने स्त्रीचे मन कुठे भेटत असेल, तर ते स्त्री-रचित परंपराशील देशी भाषेतील लोकसाहित्यात.’ त्यांना करुणेने, वेदनेने ओथंबलेली बाई दिसली त्यापेक्षा अधिक विद्रोह करणारी ही बाई त्यांना ओव्यांतून, कथागीतांतून दिसली. नाट्यक्षेत्रात पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा विविध नाट्यप्रकारांची जडणघडण शोधताना ताराबाईंनी दक्षिण भारताचा प्रवासही केला. रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन, लेखन इत्यादी नात्यांनी काम केल्यामुळे नाट्याभ्यासात त्यांना भरीव मदत झाली. ‘लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा’ हे ताराबाईंचे पुस्तक म्हणजे त्यांच्या सैद्धान्तिक अभ्यासाचा पुरावाच म्हटले पाहिजे. आकाशवाणीच्या कै.पु.मं. लाड व्याख्यानमालेच्या निमित्ताने ‘स्त्री-मुक्तीचा आत्मस्वर’ प्रकटला (१९९४).

मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश, मराठी ग्रंथकोश आदी महत्त्वाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. १९९१ साली अमेरिकेतल्या अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत आयोजित, ‘भारतीय समाज, संस्कृती आणि स्त्री’ या विषयावरील चर्चासत्रात भाग घेण्यासाठी खास निमंत्रित म्हणून त्यांची भूमिका होती.

ताराबाई यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (१९९२), ‘मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे’साठी वाङ्मय समीक्षा पुरस्कार व कै. मालतीबाई दांडेकर जीवन गौरव पुरस्कार (२००४) आदींचा समावेश आहे. जागर साहित्य संमेलन, कोकण मराठी साहित्य परिषद पहिले महिला साहित्य संमेलन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशातील साहित्य संमेलन व इतरही काही संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. ताराबाई यांची ग्रंथसंपदा विपुल असून त्यात विविधताही आहे. ‘मधुशाला’ (काव्यानुवाद), ‘प्रियतमा’ (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा), ‘लोकांगण’, ‘लोकसाहित्य : वाङ्मय प्रवाह’, ‘मायवाटेचा मागोवा’, ‘आकलन आणि आस्वाद’ (समीक्षा) ही त्यातील काही खास पुस्तके आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपा अमृत महोत्सवानिमित्त लोगो स्पर्धा,विजेत्याला आकर्षक पुरस्कार

Sat Feb 15 , 2025
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. मनपाच्या अमृत महोत्स्वानिमित्त विशेष लोगो तयार करण्यात येत आहे. याकरिता मनपाद्वारे लोगो स्पर्धा आयोजित करण्यात आली असून इच्छूकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. २ मार्च २०२५ रोजी नागपूर महानगरपालिका ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मनपाच्या या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!