महिनाभरात ९ हजार ३६३ मालमत्ताधारकांनी घेतला शास्तीचा लाभ
चंद्रपूर, ता. १४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. १० जानेवारीपासून ही योजना सुरु असून, मंगळवार, ता. १५ फेब्रुवारी रोजी शेवटची मुदत आहे. मालमत्ता कराचा भरणा करून शास्तीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे. दरम्यान, महिनाभरात ९ हजार ३६३ मालमत्ताधारकांनी १०० टक्के शास्तीचा लाभ घेतला.
१० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शहरातील नागरिकांना शास्तीत १०० टक्के माफी देण्यात आली. या योजनेचा लाभ शहरातील मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात घेतल्यानंतर चंद्रपूर शहर महानगरपालिकेने या योजनेस मुदतवाढ देण्यात आली.त्यानुसार १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के सूट देण्यात येत असून, मंगळवारी शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर कर भरल्यास १६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान ७५ टक्के, तर १ ते १५ मार्चपर्यंत ५० टक्के सूट मिळणार आहे.
१० जानेवारीपासून आतापर्यंत महिनाभरात नऊ हजार ३६३ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा करून एक कोटी ७१ लाख ६३ हजार रुपयांची शास्ती माफी मिळविली. या मालमत्ताधारकांकडून दहा कोटी ८७ लाख ३४ हजार रुपयांच्या थकीत कराची मागणी होती. यांच्याकडून नऊ कोटी १७ लाख रुपयांची कराचा भरणा करण्यात आला. या सर्वांना शंभर टक्के शास्ती माफी मिळाली आहे. १०० टक्के सूट मिळविण्यासाठी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) कार्यालयीन वेळेत भरणा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.