– रथसप्तमीच्या पर्वावर पं. बच्छराज व्यास चौकात सूर्यनमस्कार महायज्ञ
नागपूर, ता. 8 : ‘शरीर माध्यम खलु धर्मसाधनम्’ या उक्तीप्रमाणे धर्माचे/देशाचे कार्य करण्यासाठी निरोगी शरीर, निरोगी बुद्धी, व निरोगी मन आवश्यक आहे. आपल्या देशाचे व भारतीयांचे महत्भाग्य आहे की, पृथ्वीवर योग वशिष्ठ व पतंजली महर्षी यांच्यासारख्या महामुनींनी योग साधनेद्वारे श्रेष्ठ जीवनशैली स्वीकारण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी कार्य केले. त्यापासून प्रेरणा घेऊन आपला समाज योग जीवनशैली अंगिकारत आहे. पतंजली योग विद्यापीठाच्या माध्यमातून बाबा रामदेव सर्वसामान्यांपर्यंत योगाचा प्रसार करीत आहेत. त्यांच्या आवाहनानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कारासाठी अनेक सहयोगी संस्था पुढे आल्या आहेत. आज रथसप्तमीला या महायज्ञामध्ये सूर्यनमस्काररूपी आहुती देण्यासाठी समाजातील आबालवृद्ध स्त्री-पुरुष सर्व घटकांनी भाग घेऊन ७५ कोटींचे उद्दिष्ट यापूर्वीच पूर्ण केले, ही आनंदाची बाब आहे. तथापि सूर्यनमस्कार, सूर्याची, तेजाची, ओजस्वाची आराधना आपल्या नित्य जीवनाचा भाग व्हावा, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह व अ.भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी केले.
मकर संक्रमण ते रथसप्तमी अर्थात १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या काळात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ कोटी सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून क्रीडा भारती, पतंजली योग विद्यापीठ, बडकस चौक मित्र परिवार, निश्चय फाऊंडेशन व वॉर्डसमस्या निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पं. बच्छराज व्यास (बडकस) चौक येथे सोमवारी (ता. ७) सकाळी महिला व पुरुषांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. भय्याजी जोशी बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील आबालवृद्धांसह महिला व पुरुषांनी स्वतंत्रपणे सूर्यमंत्रासह १३ सामूहिक सूर्यनमस्कार उत्साहात पूर्ण केले.
यावेळी व्यासपीठावर मोहिते नगर संघचालक सुधीर दप्तरी, क्रीडा भारती, निश्चय फाऊंडेशन, वॉर्ड समस्या निवारण समितीचे ॲड. पवन ढिमोले व सचिन बढीये उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रथम पुरुष व नंतर महिलांचे सूर्यनमस्कार पार पडले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वरसम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार प्रवीण दटके, माजी आमदार गिरीश व्यास, भाजपासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते