नागपूर :- वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेच्या आवश्यक नोंदीच्या आधारे वीज दर निर्धारण प्रक्रीया पार पडावी यासाठी राज्य वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेले मापदंडांचे पालन करुन ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी चाचणी अभियंत्यांनी महत्वाची भुमिका पार पाडावी, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केले.
महावितरणच्या चाचणी व गुणवत्ता नियंत्रण मंडलातर्फ़े नागपूर येथील ‘विद्युत भवन’ कार्यालयात ‘पॉवर क्वालीटी मिटरींग – अहवाल आणि विश्लेषण’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, चाचणी व गुणवत्ता नियंत्रण मंडलाचे अधीक्षक अभियंता योगेंद्र निचत आणि मे. सेक्युअर मीटर्स लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, महावितरणमध्ये चाचणी अभियंत्याची महत्वपूर्ण भुमिका असल्यानेच त्यांची स्वतंत्र ओळख आहे. ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी नियामक आयोगाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या मापदंडाचा उहापोह करताना त्यांनी वीज वितरण कंपनी आणि ग्राहकांच्या हितासाठी नियामकांचे पालन करण्यासाठी वीजेची गुणवत्ता, त्याचे निरीक्षण आणि त्यात सुधारणा करण्यावर भर दिला.
महावितरणने निश्चित केलेल्या उपकेंद्रात वीज गुणवत्ता मीटर बसवून दर निर्धारण प्रक्रियेपूर्वी वीज गुणवत्तेच्या आवश्यक नोंदी उपलब्ध असणे आवश्यक असून राज्य वीज नियामक आयोगाच्या वीज पुरवठा संहिता आणि वितरण परवानाधारक यांच्या कामगिरीचे मानकांनुसार वितरण परवानाधारकाने पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुय्यम बाजूला पॉवर क्वालिटी मीटर स्थापित करणे आवश्यक आहे. यानुसार महावितरणच्या उपकेंद्रांत पॉवर क्वालिटी मीटर स्थापित करणे सुरु आहे. या मीटर्सचे अहवाल व विश्लेषण याबाबत या कार्यशाळेत मे. सेक्युअर मीटर्स लिमिटेडच्या प्रतिनिधीनी विस्तृत मार्गदर्शन केले, या कार्यशाळेला नागपूर परिक्षेत्रातील चाचणी व गुणवत्ता नियंत्रण मंडलातर्गत असलेले अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.