ग्रामपंचायतींना कमी दराने पाणी पुरवठा करण्यासाठी मुंबईत बैठक घेणार
नागपूर,दि.17 : नागपूर शहरालगतच्या ज्या गावांना नागपूर महानगरपालिकेच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. त्याच्या थकीत पैशांमुळे पाणी पुरवठा थांबवणे योग्य नाही. जीवन प्राधीकरण थकीत रकमेपैकी काही रक्कम भरणार असून दोन दिवसात पाणी पुरवठा पूर्वरत करा, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज दिले.
शहरालगतच्या ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करताना ग्रामपंचायतीच्या कुवतीनुसार पाणी पट्टी लावणे योग्य ठरेल. शहरी भागातील दराप्रमाणे ग्रामपंचायतीकडून पाणी पट्टी वसूल करणे अन्यायकारक होईल. तथापी हा निर्णय धोरणात्मक असल्यामुळे राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तूर्तास महानगरपालिकेने बोखारा गावासह ज्या गावांचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. त्याठिकाणी नियमित पाणी द्यावे, असे स्पष्ट केले.
आजच्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, प्रकल्प अधिकारी विवेक इलमे उपस्थित होते. पेरी अर्बन गावांच्या विविध समस्या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवारे, कुंदाताई राऊत यांनी श्री.केदार यांच्याकडे समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बहादुरा, बेसा, कापसी, गोधनी, बोखारा, पिपळा, कापसी, बिडगाव, येरखडा, रनाळा, भिलगाव, खसाळा, कवटा, पावनगाव, कोराडी, वडधामणा, नागलवाडी, इसासनी, डिगडोह, निलडोह आणि रायपूर आदी गावांचा समस्यांवर चर्चा करण्यात आली. सांडपाणी व्यवस्थापन, पथदीवे, डुकरांवर पायबंद, शहर बसची सुविधा आदींवर चर्चा करण्यात आली.