– विद्यापीठात माजी कुलगुरू स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जयंतीनिमित्त उद्योजकीय मानसिकता विकास वर कार्यशाळा संपन्न
अमरावती :- सर्वांनाच रोजगार उपलब्ध होणार नाही. उद्योजक होऊन रोजगार क्षमता वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करावी व उद्योजक बनावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधानसचिव डॉ. विकास रस्तोगी यांनी केले. माजी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थी विकास विभागाचे वतीने उद्योजकीय मानसिकता विकास वर कार्यशाळेचे डॉ. के.जी. देशमुख सभागृहात आयोजन करण्यात आले, त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, जिल्हा उद्योग केंद्राचे माजी महाव्यवस्थापक उदय पुरी, इ.सी.ए. इंडिया एनर्जी प्रा. लि. चे संचालक अमित आरोकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. दिपाली मालखेडे व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वर्गीय डॉ. दिलीप मालखेडे यांच्या कार्यावर आधारित चित्रफीत याप्रसंगी प्रसारित करण्यात आली. डॉ. रस्तोगी पुढे म्हणाले, डॉ. मालखेडे यांनी सीबीसीएस व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये घेतलेला पुढाकार दिशादर्शक होता. हिततुल्य घटकांना विश्वासात घेऊन शैक्षणिक विकासामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या रूपाने विद्यापीठाला उच्चत्तम शैक्षणिक नेतृत्व लाभले. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू स्थानी ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम व अभ्यासक्रम त्यांनी तयार केलेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांच्या कार्याचे कौतुक मंत्रीमहोदयांनी सुद्धा केले होते. त्यांचा पुढाकार इतर विद्यापीठांसाठी सुद्धा दिशादर्शक ठरला होता. त्यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली असून त्यांच्या स्मृती रहाव्यात, त्यांच्या कार्यापासून विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा मिळावी, उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी कार्यशाळा मैलाचा दगड ठरेल असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनो मोठे स्वप्न बघून पूर्ती करा – अमित आरोकार
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण होण्यासाठी माईंडसेट महत्त्वाचा आहे. माईंडसेट मधील पहिला भाग म्हणजे मोठमोठी स्वप्ने, वृत्ती, आव्हानांना सामोरे जाणे, समयसूचकता, इव्हेंट मॅनेजमेंट समाविष्ट आहे. आपण रिस्क घ्यायला तयार झालो पाहिजे. उद्योजकाला दररोज नवनवीन आव्हानांचा सामना करावा लागतो, प्रत्येक क्षेत्रात आव्हाने व समस्या आहेत. त्या दृष्टीने माईंडसेट तयार व्हावा लागतो. दरवर्षी देशात लाखो विद्यार्थी तयार होतात, सर्वांसाठी रोजगार उपलब्ध असेलच असे नाही. अशा प्रसंगी युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळलं पाहिजे. विद्यार्थी उद्योजकीय माइंडसेटचे तयार होतील व उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
नामवंत उद्योजक म्हणून नावारूपास या – उदय पुरी
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., यूपीएससी आदींबाबत पालकांकडून सांगितले जाते. परंतु उद्योजक व्हावे, यासाठी प्रोत्साहन देण्याची खरी गरज असते. उद्योग करणे ही आता कोणाचीच मक्तेदारी नाही. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाक्षमता, महत्त्वकांक्षा हे उद्योजक होण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. स्टार्टअप, स्टँडअप, नाविन्यपूर्ण उद्योग सुरू केल्यास कमी वेळात नामवंत उद्योजक म्हणून आपण नावारूपास येऊ शकतो. जिल्हा उद्योग केंद्राद्वारे उद्योगासाठी तांत्रिक प्रशिक्षण दिल्या जाते, त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. सातत्याने आपलं कौशल्य व ज्ञान वाढविण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. स्व. डॉ. मालखेडे सरांनी विद्यार्थ्यांसाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून उद्योग सुरू करण्यासाठी विविध टप्पे आजच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावेत, असेही ते म्हणाले.
मनोगत व्यक्त करताना डॉ. दिपाली मालखेडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्याचे स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांचे स्वप्न होतं. या कार्यशाळेच्या निमित्ताने स्वप्नपूर्ती होत आहे. बऱ्याच गोष्टी त्यांना पूर्ण करत्या आल्या नाहीत. स्वप्नपूर्ती, विचार, स्मृती, आदर्श व कामाच्या प्रती तळमळ हे जिवंत ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने कार्यशाळेच्या निमित्ताने उचललेल पहिल पाऊल असून ऑक्टोंबर व त्यानंतर फेब्रुवारीमध्ये वर्कशॉप चे आयोजन करण्यात असल्याची त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद द्यावा व लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
अमरावती शहरात खूप संधी – डॉ. प्रसाद वाडेगावकर
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर म्हणाले, विद्यार्थ्यांना स्वतःचा उद्योग अमरावतीत सुरू करता येऊ शकतो. त्यासाठी त्यांना खूप संधी आहेत. कौशल्य तज्ञ होण्याचा, आपल्यातील कौशल्य विकसित करण्याच्या खूप संधी त्यांना आहेत. ते कौशल्य तज्ञ होऊन रोजगार व उद्योग वाढू शकतात. अनेक क्षेत्रात खूप संधी आहेत, पण त्याची माहिती विद्यार्थ्यांना होत नाही. या कार्यशाळेच्या निमित्ताने मिळालेल्या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. तरूण उद्योजकाची ओळख अमरावती शहराला करून द्यावी, असे ते म्हणाले. विद्यापीठाकडून सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा व स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांचे पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम आयोजना मागील भूमिका प्रास्ताविकेतून करून पाहुण्यांचा परिचय संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सोनल कामे यांनी केले तर आभार डॉ. योगिता ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर, अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे, डॉ.मोना चिमोटे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, रासेयो संचालक डॉ. राजेश बुरंगे, प्रा. दिनेश सूर्यवंशी, डॉ. मालखेडे यांचे आईवडील, त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये 350 चे वर विद्याथ्र्यांनी आपला सहभाग नोंदविला.
दुपारच्या तांत्रिक सत्रात ‘‘इंटरप्रिनर्शिप अॅज अ करिअर चॉईस’’ विषयावर एम.सी.ई.डी.चे विभागीय संचालक प्रदीप इंगळे, ‘‘उद्योजकतेशिवाय पर्याय नाही : माजी कुलगुरू प्रा. दिलीप मालखेडे यांचे स्वप्न’’ विषयावर प्रो. दिपाली मालखेडे, ‘‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट’’ विषयावर लाईफ कोच निलेश देशमुख, ‘‘इंटरप्रिनर्सकरीता शासनाच्या विविध योजना’’ विषयावर जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक गिरीश सांगळे, ‘‘बिझीनेस अपॉच्र्युनिटीज गायडन्स’’ विषयावर बिझीनेस कोच नेत्रदीप चौधरी, ‘‘महाराष्ट्र स्टुडंट्स इन्नोव्हेशन चॅलेंज’’ विषयावर महाराष्ट्र राज्य इन्नोव्हेशन सोसायटीचे सह-व्यवस्थापक प्रांजली बारस्कर, तर ‘‘सक्सेस स्टोरिज अॅन्ड एक्सपेरिअन्स शेअरिंग’’ सत्राला टेकनिक फॅब्रिाकेशन, अमरावतीचे अंकुश डहाके, डॉ. सुनिता नॅनो, बायोटेक प्रा.लि. च्या संचालक डॉ. सुनिता बनसोड (तानपुरे) व हंग्री प्रोडक्ट्स पवार इंडस्ट्रीजचे विक्की पवार यांनी मार्गदर्शन केले.