मुंबई : गडचिरोली आलापल्ली वन विभाग क्षेत्र परिसरातील मुरूम गैरव्यवहारात दोषी असलेल्या वनपाल आणि वनरक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे मुरूम उत्खननाबाबत दोषींवर कठोर कारवाई कधी करणार असा प्रश्न सदस्य रामदास आंबटकर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली घोट वनपरिक्षेत्रातील जैवविविधता उद्यानातून मुरूम उत्खनन प्रकरणी प्राथमिक चौकशी करून एक वनपाल व दोन वनरक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही वनमंत्री म्हणाले. तसेच अशाप्रकारे अवैध वृक्षतोड, किंवा उत्खनन होत असल्यास वनविभागाच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारीसाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत वंदे मातरम् फॉरेस्ट टोल फ्री क्रमांक तक्रारदारांसाठी उपलब्ध आहे 1926 टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना तक्रार करता येते, असे ही ते म्हणाले.
विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे यांनीही यावेळी उपप्रश्न उपस्थित केला.