संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– स्पर्धा परीक्षा शुल्क तिनशेवरून हजारावर पोहोचले
कामठी :- स्पर्धेच्या माध्यमातून भविष्याची दिशा निश्चित करताना कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी स्पर्धावंत विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते.हलाखीच्या परिस्थितीत 100 ते 200 रुपये परीक्षा शुल्क भरण्यासाठी आर्थिक ओढाताण होत असताना सध्यस्थीतीत कुठल्याही परीक्षेचे शुल्क हे 800 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त असल्यामुळे असंख्य विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेकडे पाठ फिरवीत वाचनालये ओसाड होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने विद्यार्थ्यांची होणारी ही आर्थिक लूट थांबविण्याकरिता उपाययोजना करणे आवश्यक आहे अशीं मागणी कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांनी केले आहे.
आजच्या स्थितीत कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील शिक्षित तरुणांना शासकीय नोकरीचे वेध लागले असून अभ्यासातून शासकीय नोकरी मिळविणारच असा ध्येय निश्चित करून येथील तरुणाई मंडळी या तारुण्यवयातील स्थितीला नियंत्रणात ठेवून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित ठेवून ठिकठिकाणी उघडलेल्या स्पर्धात्मक परीक्षा अभ्यास केंद्र तसेच वाचनालयात जाऊन अभ्यास करून उज्वल भविष्याची कास धरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी कुठली नोकरी वा व्यवसाय करीत नाही त्यांना अभ्यासाकरिता लागणारा खर्च कसाबसा घरमंडळीकडून जुगाड करावा लागतो.अशा परिस्थितीतही परीक्षा क्षुल्क हे तिनशेवरून थेट हजारा पर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांना हा खर्च झेपणारा नाही आहे .
तेव्हा सरकारने यावर विचार करून परीक्षा क्षुल्क कमी केल्यास स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षा स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या आपल्या भविष्याची स्वप्न पाहू शकतील. परीक्षा क्षुल्क वाढलेल्या स्थितीत विद्यार्थ्यांना आता नोकरीच्या जागा तर निघाल्या पण परीक्षा क्षुल्क बघून मनाची धडकी भरते की एवढी रक्कम आणायची कुठून, घरमंडळी पण किती मदत करतील.तेव्हा विद्यार्थ्यांची ही मनस्थिती गांभीर्याने लक्षात घेता परीक्षा क्षुल्क कमी करण्यात यावा अशी मागणी काशिनाथ प्रधान यांनी केली आहे.