– झारखंडची टोळी पोलिसांच्या जाळ्यात
नागपूर :- प्रवाशांचे मोबाईल चोरी करून झारखंडच्या विविध गावात कवडीमोल भावात त्याची विक्री करणार्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शेख सोबराती शेख साबीर (28), शेख बाबर शेख असलम (22), दोन्ही रा. साहेगंज, झारखंड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या सोबत एक अल्पवयीन मुलगा आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेवून बालगृहात पाठविले.
नागपुरातील रहिवासी रुपेश कांतीलाल यांची पत्नी आणि मुलगी मुंबईला कामानिमीत्त जात होत्या. त्यांना सोडायला रूपेश नागपूर रेल्वे स्थानकावर आले. त्यांना डब्यात बसविले आणि खाली उतरत नाही तोच त्यांच्या खिशातील महागडा मोबाईल लंपास झाला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी मोबाईल चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एक पथक तयार केले. या पथकातील सतीश बुरडे, प्रवीण खवसे, अमोल हिंगवे, अमित त्रिवेदी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मोबाईल चोरी करताना आरोपी दिसून आले. पोलिस पथकाने आरोपींचे छायाचित्र मोबाईलमध्ये कैद करून शोध सुरू केला.
गुरूवारी सकाळी पोलिस हवालदार सतीश बुरडे आणि प्रवीण खवसे आरोपींचा शोध घेत असताना तीघेही ऑटोरीक्षाने नागपूर रेल्वे स्थानकावर आले. पेहराव आणि हालचाल पाहून त्यांच्यावर संशय बळावला. दोघांनीही त्यांचा पाठलाग करीत एकाला पकडले. दोघे जन पळून जात असताना त्यांनाही पकडले. सखोल चौकशीत मोबाईल चोरीची त्यांनी कबुली दिली. मात्र, मोबाईल कुठे आहे, याबध्दल अजून सांगितले नाही. दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.
मोमीनपुरा परिसरात घेतली भाड्याने खोली
आरोपी मुळचे झारखंडचे रहिवासी आहेत. मोमीनपुरा परिसरात किरायाने खोली करून राहतात. नागपुरात चोरी करून त्यामोबाईलची कवडीमोल भावात झारखंला विक्री करतात. आज पुन्हा चोरीच्या उद्देशाने ते स्थानकावर आले. यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे? किती चोर्या आणि काय चोरले या संदर्भात लोहमार्ग पोलिसांना तपास करायचा आहे.