मुंबई :- आंतरराष्ट्रीय योग दिनी राज्यातील सर्व ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपातर्फे योग रील स्पर्धेसोबतच अन्य विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आणि या कार्यक्रमाच्या प्रदेश संयोजक चित्रा वाघ यांनी शनिवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले व प्रदेश सरचिटणीस रश्मी जाधव यावेळी उपस्थित होत्या. यंदा ‘वसुधैव कुटुंबकम’ या कल्पनेवर आधारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा होणार आहे. २१ जून रोजी सकाळी ९.०९ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणा-या विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही वाघ यांनी केले.
वाघ म्हणाल्या की, एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांची काळजी घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे नवनिर्माण होत आहे आणि देशाची प्रगती वेगाने होत आहे. तणावमुक्त जीवनासाठी आवश्यक योग साधनेचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त राबवल्या जाणा-या उपक्रमा अंतर्गत यंदा विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. एक इन्स्टा रील ची स्पर्धा घेण्यात येणार असून,२१ जूनपर्यंत सर्वांनी @BJP4Maharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवर योगसाधना करतानाचे रील पोस्ट करावेत असे आवाहन वाघ यांनी केले.रील चे हॅशटॅग #Yogafor9@9 हे असेल व ज्या रील ला सर्वाधिक लाइक्स व जे रील सर्वाधिक रीट्वीट केले जातील अशा रील्स ना भाजपा लोकप्रतिनिधींमार्फत बक्षीस दिले जाणार आहे. या दिवशी ९ मिनिटांचा पॉवर योगासनांचा कार्यक्रमही सादर आहे. त्याचबरोबर गेट वे ऑफ इंडीया इथे ९.०९ मि. नी ९० महिला नऊवारी नेसून अभिनव पद्धतीने योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
राज्यात १९ जूनला महाराष्ट्रातील महिलांसाठी सहकारी संस्थांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येईल, अशी माहितीही वाघ यांनी दिली. आ. प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून होणा-या या शिबीरामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.