वर्धा :- नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगर परिषदेने ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. राज्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून, केवळ १० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॅायलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगर परिषदेद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील निसर्गरम्य परिसरात २०० स्केअर फूट इतक्या कमी जागेत हे टॉयलेट उभारण्यात आले आहे.
यामध्ये एक कॅफे, पुरुष व महिलांकरिता प्रत्येकी २ पाश्चात्त्य पद्धतीचे शौचालय, वॉश बेसिन तसेच महिलांकरिता सॅनिटरी वेंडिंग मशिन या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समोरील दर्शनीय भागात कॅफे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना स्वास्थवर्धक व आरोग्यदायी अंकुरित कडधान्य व ताज्या फळांचे ज्यूस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या स्मार्ट कॅफेचे व्यवस्थापन बचत गटाच्या महिलांना देण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागरिकांना टॉयलेटच्या टेरेसवर बसून ज्यूस पिण्याचा आनंद घेता येणार आहे. या स्मार्ट कॅफे टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे.
शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून या उपक्रमाला प्रसिद्धी देण्यात आली आहे. स्मार्ट कॅफे टॉयलेटच्या निर्मितीसाठी नगर परिषदेचे प्रशासक हर्षल गायकवाड, नगर अभियंता जगदीश पटेल, कनिष्ठ अभियंता बाबा अली यांनी विशेष सहकार्य केले.
कमी खर्चात अधिक उपयुक्त उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. हिंगणघाट नगर परिषदेने अतिशय कमी खर्चात उत्तम असे दुहेरी उपयुक्त मॅाडेल तयार केले आहे. केंद्र आणि राज्य शासनानेदेखील या टॉयलेटची दखल घेतली आहे. येत्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी असे टॉयलेट उभे राहतील, यासाठी प्रयत्न करू. यासाठी अन्य नगर परिषदांनीदेखील पुढाकार घेणे आवश्यक आहे.
– राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा