चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 शहीद क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन

चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे योगदान ऐतिहासिक आहे. या शहिदांच्या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. चिमूर येथे शहीद क्रांतीदिनानिमित्त आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हंसराज अहीर, अशोक नेते, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, कीर्तीकुमार भांगडीया, किशोर जोरगेवार, कृष्णा गजबे, देवराव होळी, माजी आमदार मितेश भांगडीया, सुधीर पारवे, संजय धोटे, संदीपाल महाराज, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान 1942 च्या क्रांतीपर्वात बलिदान करणाऱ्या चिमूरच्या सुपुत्रांना अभिवादन करुन  उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, ते दिवस मंतरलेले होते. सर्वांचा एकच ध्यास होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाणीतून आणि शब्दातून तरुणांमध्ये देशभक्तीचा उत्साह संचारला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होण्याची नागरिकांची तयारी होती. 1942 च्या चलो जाव आंदोलनामध्ये देश लढत असतांना भारतात सर्वात प्रथम चिमूर स्वतंत्र झाले, तशी घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिनच्या आकाशवाणीवरून केली होती. इंग्रज राजवटीत स्वतंत्र होणारे चिमूर हे देशातील पहिले गाव ठरले. या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक शहीद तर अनेकांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. 1942 पासून सुरू झालेली क्रांतीची ही मशाल देश स्वातंत्र्य होईपर्यंत तेवती राहिली. या स्वातंत्र्यलढ्यात ज्या अज्ञात नायकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा सर्व अज्ञात नायकांचा इतिहास पुढच्या पिढीला सांगण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर चिमूरच्या इतिहासावर आणि शहीद क्रांतीवर अतिशय सुंदर माहितीपट तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री  फडणवीस पुढे म्हणाले की, चिमूरमध्ये आज अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून समितीचे गठन करण्यात आले आहे. चिमूर हा स्वतंत्र जिल्हा नसला तरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची पदे मंजूर झाली आहेत. त्यामुळे जेव्हा-केव्हा राज्यात स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय घेतला जाईल, त्यावेळी चिमूरचे स्थान सर्वात अग्रस्थानी असेल, असे सांगून आमदार भांगडिया यांच्याकडून चिमूरच्या विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी प्रशंसोत्गार काढले.

यावर्षी अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत जाहिर केली आहे. अधिवेशन संपल्याबरोबर मदत वाटपाचे काम सुरू होईल. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येईल. याशिवाय पूर परिस्थितीमुळे ज्यांची घरे पूर्णतः किंवा अंशतः पडली आहे, जमीन खरडून गेली असेल किंवा जनावरे वाहून गेले असतील, त्या सर्वांना मदत मिळणार आहे. चंद्रपूर हा धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. धानाच्या बोनससाठी मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 2014 ते 2019 राज्याने जनतेचे सरकार अनुभवले आहे. आज पुन्हा लोकाभिमुख सरकार राज्यात आले असून प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनासाठी वेगवेगळे योजना सरकार राबविणार आहे. गेल्या काही कालावधीत प्रलंबित राहीलेले सर्व प्रश्न मार्गी लावून पंतप्रधान आवास योजना, हर घर जल योजना, उज्ज्वला योजना व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

          उपमुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते जवळपास 800 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात 294 कोटींचा मुख्य रस्ता, श्रीहरी बालाजी देवस्थान येथे सभागृह व परिसर सौंदर्यीकरण (किंमत 5 कोटी), नागभीड येथे क्रीडा संकुलाचे लोकार्पण (4 कोटी), हायब्रीड अन्युटी अंतर्गत 285 कोटींचा रस्ता, चिमूर तालुक्यातील सावरीबीड येथे 5 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि निवासी वसाहत आदींचा समावेश होता.

चिमूर ही देशाला दिशा देणारी भूमी – मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व कामगिरी बजावली असून ही भूमी देशाला दिशा देणारी आहे, असे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले. ते पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चिमूरचे योगदान ऐतिहासिक आहेच त्यासोबतच भारत-चीन युद्धाच्या वेळी सर्वात जास्त सूवर्णदान चंद्रपूर जिल्ह्याने दिले आहे. दिल्ली येथे नवीन संसद भवनाची जी इमारत तयार होत आहे, त्या सेंट्रल विस्टामध्ये चंद्रपूरचे लाकूड उपयोगात येत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. धान्याचा बोनस देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा विश्वास या सरकारने दिला आहे, असे सांगून आता दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर हॅलोऐवजी वंदे मातरम हा शब्द उच्चारण्याचा संकल्प  या क्रांती दिनापासून सर्वांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते चिमूर येथील शहीद स्मारक येथे आणि किल्ला परिसरातील संत तुकडोजी महाराज आणि शहीद बालाजी रायपूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील ग्रेड पोउपनि साहेबराव बहाळे यांचे इनेक्ट्रीक करंट लागून मृत्यु

Thu Aug 18 , 2022
नागपुर – मोटार परिवहन विभाग नागपूर ग्रामीण, पोस्टे कपिल नगर नागपूर षहर येथे दि. 17.8.2022 चे 07.30 ते 07.45 वा. सुमारास मोटार वाहन चालक ग्रेड पोउपनि  साहेबराव बहाळे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलीस हे मोटार परिवहन विभाग नागपूर ग्रामीण येथील वॉशिंग रैम्प वर इलेक्ट्रीक मोटार लाऊन त्यांच्या ताब्यात असलेले शासकीय वाहण धुण्याकरिता गेले असता त्यांना पाण्याचे इलेक्ट्रिक मोटार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com