नागपूर, ता. २४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक १९, हंसापुरी खदान येथील खेळाच्या मैदानाच्या लोकार्पणासह विविध चौक आणि मार्गांचे शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी ५.३० वाजता हंसापुरी खदान येथील गोपाळराव मोटघरे मनपा प्राथमिक शाळेमध्ये नामकरण करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मैदानाचे लोकार्पण आणि नालसाहेब चौक ते धोंडोबा चौक या मार्गाचे ‘महादेवराव प्रजापती मार्ग’, धोंडोबा चौक ते सेवासदन चौक या मार्गाचे ‘मेवालाल बाथो मार्ग’, खान मस्जिद, गीतांजली चौक येथील निलगिरी अपार्टमेंट समोरील टी-पॉईंटचे समाजसेवी ‘नामदेव मोगरकर टी-पॉईंट’, गीतांजली चौक येथील गुडलक ट्रॅव्हल्स समोरील टी-पॉईंटचे ‘माणिकराव मोटघरे त्रिवेणी पथ’, सेवासदन चौक येथील स्टार रेसिडेन्सी हॉटेल समोरील चौकाचे समाजसेवी ‘मनिराम प्रजापती चौक’ आदी चौक व मार्गांचे नामकरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित राहतील. महापौर दयाशंकर तिवारी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवितील. कार्यक्रमाला विशेषत्वाने खासदार डॉ.विकास महात्मे आमदार सर्वश्री नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, बसपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, रा.काँ. पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेने गटनेता किशोर कुमेरिया, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक यांची उपस्थिती असेल.
कार्यक्रमाला नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांनी केले आहे.