नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे शहरातील विविध उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुष्पोत्सव २०२५ ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृवात उद्यान विभागाद्वारे शहरातील प्रमुख १५ उद्यानामध्ये ‘पुष्पोत्सव २०२५’चे २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील १५ उद्यानांमध्ये आलेल्या नागरिकांनी ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला भेट देत निरनिराळ्या वनस्पतीची माहिती जाणून घेतली. नागरिकांनी मध्य भारतात आढळणाऱ्या देशी झाडांचे विविध उपयोग जाणून घेतले. रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी झाडे, आर्टिफिशियल फुले आदीसह निरनिराळ्या प्रकारचे शोभिवंत फुले, आकर्षक पुष्परचना, आकर्षक रोषणाईची सुविधा महानगरपालिका उद्यानात उपलब्ध करुन दिल्याने मनमोहक ‘पुष्पोत्सव’ प्रदर्शनाला बघून नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
१५ विविध उद्यानांमधील पुष्प प्रदर्शनातील आकर्षक व मोहक फुले पाहण्यात लहान-थोर मंडळी गढून गेल्याचे दिसून येत होते. मनमोहक फुलांची छबी आपल्या मोबाईलमध्ये लहान, वृद्ध, युवक युवती टिपताना दिसत होतेच, त्यासोबत आकर्षक वेगवेगळ्या फुल्यांच्या सानिध्यात आणि सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेण्याचा मोह सगळ्यांनाच अनावर होताना दिसत होते. सेल्फीसाठी पुष्प प्रदर्शनातील प्रत्येक ठिकाणी लाईन लागली होती .
तर फुलांनी सजलेल्या लव आर्च वर नागरिकांनी छायाचित्र काढले. राजीव गांधी उद्यान, त्रिमूर्ती नगर, मेजर सुरेंद्र देव पार्क धंतोली, लता मंगेशकर उद्यान, देशपांडे लेआऊट येथील स्वातंत्र सुवर्ण जयंती उद्यान, शंकर नगर उद्यान, भारतमाता उद्यान, त्रिशताब्दी उद्यान, नंदनवन, महात्मा फुले उद्यान, सुयोग नगर, महात्मा गांधी उद्यान हनुमान नगर, तुलसी नगर उद्यान, शांतीनगर, पाटणकर चौक उद्यान, ॲड. सखारामपंत मेश्राम उद्यानात पुष्पोत्सव प्रदर्शनामध्ये १०० हून अधिक सीजनल व पेरॅनियल फुलांचे प्रकार व विभिन्न प्रजातींची फुले, औषधी वनस्पतीची झाडे विविध ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळतं आहेत. नागरिकांनी ‘पुष्पोत्सव २०२५’ ला भेट द्यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
पुष्पोत्सव २५ जानेवारी पासून ते २ फेब्रुवारीपर्यंत सर्व नागरीकांसाठी सकाळी ५.००ते १०.०० तर सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
“पुष्पोत्सवाचे आयोजन करून नागपूर महानगरपालिकेतर्फे’ खूप छान असा पुढाकार घेण्यात आला आहे. जे कुठल्याही उद्यानात दिसत नाही. अशाप्रकारे उद्यानाचा विकास केला तर नागरिकांना त्याचा लाभ अधिक घेता येऊ शकतो.”
– राहुल सावदे
“नागपूर महानगरपालिकेतर्फे’ ‘पुष्पोत्सवाचे आयोजन केल्याने नागरिकांना लाभ मिळेल. तरी उद्यानामधील फुलांचे सातत्याने देखभाल करणे आवश्यक आहे.”
– डॉ. माधुरी ठाकरे
“पुष्पोत्सव खूप छान असे उपक्रम मनपातर्फे राबविण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक उद्यानात असे उपक्रम राबविले तर मुलांना पर्यावरणाशी जोडता येईल आणि लहान मुलांना अशा पुष्पोत्सवामध्ये आणून त्यांना अधिक माहिती देता येईल. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे हा संदेश देता येईल.’’
– मानसी बोदेले
“लोकांना निसर्गाच्या सानिध्यात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा पुष्पोत्सव चांगला उपक्रम आहे. अशामुळे मनप्रसन्न होते. महापालिकेने योग्य लक्ष देण्याबरोबर नागरिकांनी उद्यान स्वच्छ ठेवण्यास मदत करायला हवे.”
– राजेश टावरी