– ठिकठिकाणी पुष्पवर्षावाने रॅलीचे स्वागत
नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत सोमवारी (ता: १२) “तिरंगा बाईक रॅली” चे आयोजन करण्यात आले. तिरंगा बाईक रॅलीच्या भ्रमंती मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. स्वागताचे दृश्यबघून संपूर्ण शहर देशभक्तीच्या वातावरणात रंगल्याचे दिसून आले. नागरिकांनी ”तिरंगा बाईक रॅली” उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आवारातून प्रारंभ झालेल्या तिरंगा बाईक रॅलीला मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त प्रकाश वराडे, मिलिंद मेश्राम, डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, सहा. अधीक्षक राजकुमार मेश्राम, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेद्वारा येत्या १५ ऑगस्ट पर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत असून, नागपूरकरांनी या अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवावा असे गोयल यांनी यावेळी केले.
सर्वात पुढे अग्निशमन विभागाचे वाहन त्यामागे उपद्रव शोध पथकाचे जवान आणि नंतर कर्मचाऱ्यांचा बाईक ताफा असे या “तिरंगा बाईक रॅली”चे स्वरूप होते. तिरंगा ध्वज हाती घेऊन व “भारत माता की जय” असा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आवारातून प्रारंभ झालेली बाईक रॅली लीबर्टी सिनेमा थिएटर चौक होत छावणी चौक, जुना काटोल नाका चौक, जापनीस सेमिनरी हिल्स चौक, लेडीज क्लब चौक, जीएस कॉलेज चौक, शंकरनगर चौक, झांशी राणी चौक, आनंद सिनेमा थिएटर, नवीन लोहपूल अंडर पास होत मोक्षधाम घाट चौक, सरदार पटेल चौक, अशोक चौक, जगनाडे चौक, गंगाबाई घाट चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, अग्रसेन चौक, मेयो हॉस्पिटल चौक (सीए रोड), संविधान चौक होत मनपा मुख्यालयात परतली. यावेळी मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करून रॅलीचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रॅलीची सांगता
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात शालेय विद्यार्थांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी विद्यार्थांनी सदर केलेल्या कलागुणांची प्रशंसा करीत विद्यार्थांचे कौतुक केले. याप्रसंगी क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.
यात एम ए के आझाद उर्दू माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी “सारे जँहासे अच्छा” गाण्यावर नृत्य सादर केले. तर दुर्गानगर उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एकवीराआई” या गाण्यावर कोळी नृत्य सादर केले. याशिवाय नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषेत त्यांनी देशाला प्रेरित करण्यासाठी दिलेले संदेश सादर केले. त्यात सरदार भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, देशाचे प्रथम पंतप्रधान श्री. जवाहरलाल नेहरू, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी सादर केले.