– ४०६ जागांकरिता ८५१ अर्ज : नव्या सत्रात एकूण १३२७ विद्यार्थी
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ‘द आकांक्षा फाउंडेशन’च्या सहकार्याने नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शाळांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून ४०६ जागांकरिता ८५१ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी इतर शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यात कुठेही मागे राहू नयेत, या हेतूने मनपाद्वारे २०२१ साली इंग्रजी माध्यमांच्या शाळांची सुरूवात केली.पूर्व नागपुरात बाभुळबन मनपा इंग्रजी माध्यम शाळा, पश्चिम नागपुरात रामनगर मनपा इंग्रजी माध्यम शाळा, उत्तर नागपुरात राणी दुर्गावती मनपा इंग्रजी माध्यम शाळा, दक्षिण नागपुरात रामभाऊ म्हाळगीनगर मनपा इंग्रजी माध्यम शाळा, दक्षिण-पश्चिम नागपुरात स्व. बाबुराव बोबडे मनपा इंग्रजी माध्यम शाळा आणि मध्य नागपुरात स्व. गोपालरावजी मोटघरे (खदान) मनपा इंग्रजी माध्यम शाळा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सुरूवात झाली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या सहाही शाळांमध्ये नि:शुल्क प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मागील वर्षी या शाळांमध्ये ज्यूनिअर केजी व सीनिअर केजी करिता प्रवेश देण्यात आले होते. यावर्षी ज्यूनिअर केजी, सीनिअर केजी, ग्रेड १ आणि ग्रेड २ करिता सुद्धा प्रवेश देण्यात आले. या प्रवेश प्रक्रियेला नागरिकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनपाच्या या इंग्रजी शाळांमध्ये नि:शुल्क दर्जेदार शिक्षण दिले जाते. ही माहिती शिक्षणाधिकारी राजेन्द्र पुसेकर यांनी दिली.
यावर्षी ४०६ जागांकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यासाठी तब्बल ८५१ अर्ज प्राप्त झाले. यावर्षी मनपाच्या सहाही शाळांमध्ये एकूण १३२७ एवढी पटसंख्या असणार आहे, अशी माहिती द आकांक्षा फाउंडेशनचे शालेय संचालक सोमसुर्व चॅटर्जी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात मनपाच्या स्व. गोपालरावजी मोटघरे (खदान) इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ज्यूनिअर केजी, सीनिअर केजी, ग्रेड १ आणि ग्रेड २ या वर्गांमध्ये प्रत्येकी ८० एवढी पटसंख्या असेल. रामनगर मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ज्यूनिअर केजी आणि सीनिअर केजीमध्ये प्रत्येकी ४०, ग्रेड १ मध्ये ४४ आणि ग्रेड २ मध्ये ४३ विद्यार्थीसंख्या राहिल. स्व. बाबुराव बोबडे मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ज्यूनिअर केजी, सीनिअर केजी, ग्रेड १ आणि ग्रेड२ या वर्गांमध्ये प्रत्येकी ४० पटसंख्या, बाभुळबन मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ज्यूनिअर केजी साठी ४० तर सीनिअर केजी, ग्रेड १ आणि ग्रेड २ साठी प्रत्येकी ८० पटसंख्या, रामभाऊ म्हाळगीनगर मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ज्यूनिअर केजी आणि सीनिअर केजी साठी प्रत्येकी ४० तर ग्रेड १ आणि ग्रेड २ साठी प्रत्येकी ८० पटसंख्या, राणी दुर्गावती मनपा इंग्रजी माध्यम शाळेमध्ये ज्यूनिअर केजी, सीनिअर केजी, ग्रेड १ आणि ग्रेड २ साठी प्रत्येकी ४० पटसंख्या आहे. सहाही शाळा मिळून ज्यूनिअर केजी करिता एकूण २८०, सीनिअर केजी करिता एकूण ३२०, ग्रेड १ करिता एकूण ३६४ आणि ग्रेड २ करिता एकूण ३६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे, असेही चॅटर्जी यांनी सांगितले.
बाभुळबन मनपा इंग्रजी माध्यम शाळा, राणी दुर्गावती मनपा इंग्रजी माध्यम शाळा, रामभाऊ म्हाळगीनगर मनपा इंग्रजी माध्यम शाळा, या शाळांचे प्रवेश प्रकिया अर्ज स्विकारले असून या शाळांमध्ये वर्ग खोल्याच्या बांधकाम सुरु असल्याने अजूनपर्यंत प्रवेश प्रकिया राबविण्यात येत आहे.