नागपूर :- भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे कचरा प्रक्रियेला गती देण्यात यावी आणि प्रक्रियेची क्षमता वाढवून समाधानकारक प्रगती दर्शवावी, असे सक्त निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुसबिडी कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेला दिले. मुख्यमंत्री यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवास्थानी आयोजित बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आणि सुसबिडी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी येथील ३९ एकर जागा सुसबिडी (सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe)) कंपनी ला कचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता देण्यात आली आहे. आता कंपनीद्वारे प्रायोगिक तत्वावर बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले आहे, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सुसबीडी कंपनी चे प्रोजेक्ट मॅनेजर नितीन पटवर्धन यांनी सांगितले की, कंपनीद्वारे प्रक्रियेमध्ये दररोज प्रगती होत असून नजीकच्या काळात पूर्ण क्षमतेने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुसबीडी कंपनीतर्फे सांगण्यात आलेल्या विहित कालावधीमध्ये प्रकल्पाची गती वाढवून कामात प्रगती दिसून यावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
याप्रसंगी उपायुक्त विजय देशमुख, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे, सुसबिडी च्या वृंदा ठाकुर, वित्त संचालक विनोद टंडन, सल्लागार राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.