जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी ला साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्टये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत लोकमान्य टिळक स्वातंत्र्य संग्रामात सहाभागी झाले होते. तसेच टिळकांनी तरुणांची मोट बांधण्यासाठी शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु केली.
शिवाजी महाराज त्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा त्यांच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करुन जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफेच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्यांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजात होती. पण शिवाजी महाराजांनी अशाही परिस्थितीत परकीयांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा पण केला. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते.
छत्रपती शिवराय म्हणजे ज्यांचे नुसते नाव उच्चारताच आपल्या हदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. संपूर्ण अंगावर रोमांच उभे राहतात आणि आपल्या नसानसांतून रक्ताचा प्रवाह दुप्पट वेगाने सुरु होतो. कसली जादू आहे या नावात.
जगभरातल्या कित्येक तत्वचिंतकांनी, क्रांतीकारकांनी महाराजांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन आपल्या कार्याची दिशा ठरवली आहे. छत्रपती शिवराय म्हणजे उत्तुंग पराक्रमाचे, प्रखर स्वाभिमानाचे आणि जाज्ज्वल देशभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण. छत्रपती शिवरायांनी अत्याचारी आणि जुलमी राजवटीविरोधात स्वराज्यातील सामान्य माणूसही विद्रोह करु शकतो, ही भावना निर्माण केली. छत्रपती शिवराय म्हणजे स्वराज्याची स्थापना करुन या मातीतल्या गोरगरीब माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष.
स्त्रीला मातेचा दर्जा देवून, स्त्री ही मराठयांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे. अशी निर्मळ भूमिका घेणारे महामानव. या मातीत आत्मसन्मानाची फुंकर घालणारे द्रष्टे राजे, शिवरायांच्या चरित्राचा, त्यांच्या कर्तत्वाचा मागोवा घेतल्यास छत्रपती शिवराय म्हणजे अखंड स्फूर्तीचा झरा आणि जगातील सर्वोच्च आदर्शाचा मानबिंदु आहेत हे आपल्या लक्षात येईल.
शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मावळयांच्या सोबतीने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे स्वराज्य हे कोण्या एका जातीधर्माचे नव्हते तर अठरापगड जातीधर्माचे होते. शिवरायांनी उभ्या आयुष्यात कधी माणसामाणसात भेद केला नाही. त्यांचा लढा हा स्वराज्याच्या आड येणाऱ्या राजसत्तेविरुध्द होता. जुलमी मुस्लिम शासकांविरुध्द होता. मुस्लिम समाजाशी नव्हे, ते इस्लाम धर्माच्याही विरोधात नव्हते. त्यांना मुस्लिमांबद्दल सुध्दा तेवढाच आदर होता. म्हणूनच त्यांनी रायगडसारख्या किल्ल्यावर मुस्लिम बांधवांसाठी मशीद बांधली. त्यांच्या सैन्यात मुस्लिमांनाही मानाच्या जागा होत्या.
शिवरायांच्या राज्यकारभारात जातीयता नव्हती. त्यांचे राज्य धर्मवादी नव्हते. प्रसंगी प्राणाहुती देण्याचीही त्यांची तयार असायची पन्हाळयाच्या वेढयातून शिवाजी राजे सहीसलामत निसटण्याकरिता शिवा न्हाव्याने हसत हसत मृत्युला कवटाळले, बाजीप्रभूंनी मूठभर मावळयांच्या सोबतीने घोडखिंड लढविली आणि महाराज सुखरुप पोहोचल्याची वार्ता समजल्यावर प्राणार्पण केले. आग्रा कैदेतून शिवाजी राजांना निसटण्यासाठी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहता यांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला.
सिंहगड सर करण्याची मोहिम तानाजीने मुलाचे लग्न बाजूला ठेऊन प्राधान्याने पार पाडली. अफजलखान वधाच्या प्रसंगी जीवा महालाने जीव धोक्यात घालून शिवाजी राजांना वाचविले. अशा अनेक इतिहासाला ज्ञात-अज्ञात असणाऱ्या प्रसंगांवरुन हेच स्पष्ट होते की शिवाजी राजांना जागविण्यासाठी, शिवशाही उभारण्यासाठी आपले शिर तळहातावर घेऊन सामान्य प्रजा तयार होती आणि ती प्रजा कुण्या एका धर्माची, पंथाची, जीतीची नव्हती. त्यामुळेच जातिभेद अथवा धर्मभेद न करता बुध्दीप्रामाण्यवादी वृत्तीने, सर्वधर्मसमभाव या न्यायाने रयतेशी वागणारे शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष राजे होते.
शिवाजी महाराजांचे जीवन एका आख्यायिकेप्रमाणेच असल्याचे भासते. जाणून घेऊया शिवाजी महाराजांबद्दलच्या काही रंजक गोष्टी
शिवाजी महाराजांचे ते सात घोडे
शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. शिवाजी महाराज घोड्यांचा वापर निर्णायक प्रसंगी करत असत. शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमांमध्ये घोड्यांचा वापर नेमकेपणाने केला. शिवाजी महाराजांकडे मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे सात घोडे होते. कृष्णा या पांढऱ्या घोड्यावर शिवाजी महाराज राज्यभिषेकानंतर बसले होते. सुरतवर चढाई, आग्राहून सुटका अशा मोहिमांवर त्यांनी विजय मिळवला.
शिवाजी महाराजांचे गड-किल्ले
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना सुमारे 400 गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वत: बांधले, तर काही किल्ले लढाया करुन जिंकले. महाराजांचे गड-किल्ले म्हणजे स्थापत्यशास्त्रज्ञ, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते.
शिवाजी महाराज : अभियंता, भूगर्भशास्त्रज्ञ
आजच्या घडीला आपण 300 फूट बोअर घेऊनही पाणी लागत नाही. परंतू महाराजांच्या 400 वर्षानंतरही महाराष्ट्रातील कुठल्याही किल्ल्यावर गेलो, तर 4 हजार फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्ल्यावरील टाक्यांमधून स्वच्छ पाणी आढळते. या गड-किल्ल्यांवर कोणतीही पाईपलाईन असल्याचे दिसत नाही.
शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर 2 प्रकारचे हौद बांधले. एक खुले आणि दुसरे भूगर्भात किल्ल्यावरील पाण्याचे हौद वा टाक बांधकामात खडक फोडण्यासाठी दारुगोळा किंवा सुरुंग कधीच वापरले नाहीत. त्याऐवजी नैसर्गिक साधनांचा वापर करुन खडक फोडले. म्हणूनच टाक्यांचा आकार एकदम आयताकृती आहे. याच टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. वयाच्या 17 व्या वर्षी शिवरायांनी स्वत: डिझाइन करुन राजगड बांधल्याचे सांगितले जाते.
अष्टप्रधान मंडळ
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अनन्य साधारण होते. या अष्टप्रधान मंडळात 8 मंत्री होते. 30 विभागांत त्यांचे काम विभागलेले होते. या 30 विभागातील कामाच्या व्यवस्थापनासाठी 600 कर्मचारी नेमण्यात आले होते. महाराजांसमोर येणाऱ्या प्रकरणांचा समोरासमोर निकाल लावला जात असे. रायगडावर कामासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती भोजन केल्याशिवाय गडउतार होत नसे.
चारित्र्यसंपन्न जाणता राजा
जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे. ज्याच्या दरबारी कधी स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. महाराजांनी स्वत:साठी मोठे महाल बांधले नाहीत. सत्तेचा वापर स्वत:च्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. शिवाजी महाराज नेहमी ‘रयतेचं स्वराज्य’ असाच शब्द वापरत. महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर 1671 मध्ये मीठ शेती केली जायची. परंतु इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी तेथील शेती मोडीत काढण्यासाठी गोवा प्रांतातून मीठ आणून त्याची स्वस्तात विक्री सुरु केली, हे लक्षात आल्यावर महाराजांनी आयात मिठावर कर लावला, त्यामुळे आयात मीठ महाग झाले व आपल्या शेतकऱ्यांच्या मिठाची मागणी वाढली. म्हणूनच छत्रपतींना ‘जाणता राजा’ म्हणतात. अशा अनेक गोष्टी छत्रपतींनी रयतेसाठी पुढाकार घेऊन केल्या.
शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि अक्षरश: मुठभर सहकार्यांच्या मदतीने त्यांनी इतिहास दत्त कार्य केले, असे करण्यासाठी लागणारी धीरोदात्त वृत्ती, संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते म्हणूनच हे शक्य झाले. भूमीवर अधिपत्य गाजवणारे अनेक भुपती… या जगती जन्मले आणि मेले, परंतु करोडो ह्दयावर अधिपत्य गाजवणारे एकच शिवछत्रपती अवतरले …!! छत्रपती शिवाजी महाराज ..
गगन भेदी नजर ज्याची,
पहाड सम विशाल काया !!
धगधगता सुर्य ही झुकतो
झीवंदितो तुला शिवराया !!!
– कविता फाले-बोरीकर माहिती व जनसंपर्क,कार्यालय नागपूर