– गजर भिम गीतांचा संगीतमय कार्यक्रमाला श्रोत्यांची गर्दी
नागपूर :- नागपूर महानगरपालिका तथा महाप्रज्ञा बौध्द विहार चांदीपुरा महाल, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती दिनाच्या पुर्व संध्येला रवीवारी (दि. १३) गाडीखाना मैदान, महाल येथे मराठी चित्रपट सृष्टीचे ख्यातनाम संगीतकार आणि गायक आदर्श शिंदे व शिंदेशाही ग्रुप यांचा गजर भिम गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचा शुभारंभ केन्द्रीय परिवहन महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी हस्ते झाला. यावेळी वित्त नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, विशेष उपस्थिती म्हणून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त विनोद जाधव, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर, माजी नगरसेवक बंडू राऊत, दीपांशू लिंगायत, भंते कुणाल कीर्ती यावेळी उपस्थित होते.
सर्वप्रथम बुद्ध वंदना ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले होते अशा सर्व दिन दलित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन सामाजिक समता आणि समरसता या विषयाकरीता समर्पित केला. आपल्या समाजामध्ये सामजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे अस त्यांचे स्वप्न होते आणि म्हणून या समाजातील जातीयवाद अस्पृश्यता समोर नष्ट झाली पाहिजे. पण हे केवळ भाषणातून होणार नाही तर प्रत्येक माणसाच्या व्यक्तिगत कृतीतून होणार असेही गडकरी यावेळी म्हणाले.
येणाऱ्या काळामध्ये समाजाला बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारावर पुढे जाण्याची गरज आहे भगवान गौतम बुद्धांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला आणि आज आपलं संपूर्ण विश्व एका महाप्रलयाच्या काठावर उभा आहे. जगामध्ये अनेक युद्ध सुरू आहेत आणि त्यामुळे आज विश्वशांतीचा सत्य आणि अहिंसेचा संदेश जो भगवान गौतम बुद्धांनी दिला आहे तो आपल्याला समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. प्रगतिशील समृद्ध संपन्न राष्ट्र निर्माण करत असताना सत्य अहिंसा आणि शांती याचा विश्व कल्याणाचा संदेश हा लोकांपर्यंत देण्याची मोठी आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे संचालन दीप काकडे यांनी केले.
यावेळी आदर्श शिंदे आणि त्यांच्या ग्रुपने सोनियाची उगवली सकाळ… जन्मास आले भीम बाळ…., क्रांतीसुर्य तू……माझा भिमराया…..माझ्या भीमाच्या नावाचं..कुंकू लाविलं रमानं…,शांतीदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा प्रथम नमू गौतमा चला हो…, प्रथम नमू गौतमा……..,उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे….., चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया………., मन गहिवरले फुलून बहीवरले….,नांदणं नांदणं होत रमाचं नांदणं…., हे गीत सादर केले.