भाषा हे सामाजिक अभिसरणाचे महत्त्वाचे घटकरूप आहे. समाजात वेगवेगळ्या व्यक्ती व व्यक्तीसमूह सतत आपापल्या संस्कृतीचे आविष्करण घडवीत असतात, ते आपापल्या भाषामाध्यमातून. नुसत्या महाराष्ट्राचा विचार केला तरी विविध भाषा बोलणारे अनेक व्यक्ती-समूह आहेत. हे व्यक्तीसमूह कधी प्रमाणभाषेचा, कधी प्रादेशिक भाषेचा तर कधी पारंपारिक भाषेचा अभिमान वाळगून स्वतःच्या भाषेव्यतिरिक्त इतर भाषांसंबंधी कधी द्वेष, कधी तुच्छता तर कधी असहिष्णुता व्यक्त करीत राहतात. असाच प्रकार भिन्न भिन्न जातींच्या संदर्भातही संभवतो. एकच भाषा परंतु भिन्न भिन्न जातींनी वापरलेली व उच्चारलेली भाषा माणसांचे गट निर्माण करते. भाषा पुष्कळदा सामाजिक असंतुलन राखण्यास मदतही करते. सामाजिक अभिसरणाच्या मार्गातील भाषाही कैकदा अडसर ठरते ती यामुळेच मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगणारी माणसे सर्वच स्तरांत सापडतील. पैजेत अमृतालाही जिंकणारी अशी एकीकडे अतिरिक्त भावना तह आम्ही मराठी भाषेचे शिवाजी आहोत, अशी आंग्ल भाषेत मिर-वण्याची प्रवृत्ती दुसऱ्या टोकाची. मराठी माझी मातृभाषा आहे याचा मला नेहमीच गर्व वाटतो. पण राष्ट्राचा विचार करताना ‘हिंदी ही सामाजिक दळणवळणासाठी अधिक उपयुक्त भाषा आहे’ असे उद्गार काढणारे डॉ. वावासाहेब आंबेडकरही आपल्याला विचारप्रवृत्त करतात. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांत बोलल्या जाणाऱ्या एकाच भाषेसंबंधाने जेव्हा ‘हा ब्राह्मणासारखा वोलतो’, ‘हे पानी-लोनीवाले’, ‘यांना नीट उच्चार करता येत नाही’, ‘आमच्या घराण्यात उत्तम मराठी बोलतात’ असे उद्गार ऐकायला मिळतात तेव्हा, भाषा हे माध्यम सामाजिक सुसंवादासाठी किती महत्त्वाचे आहे, याचा प्रत्यय येतो. हे एक प्रकारचे सामाजिक युद्धच असते, भाषांचे हत्यार घेऊन जुंपलेले. सामाजिक युद्धे, देशांतर्गत होणाऱ्या राजकीय युद्धासारखी नसतात. पण ही सामाजिक युद्धे समाजाला काही कमी हानी पोचवीत नाहीत. अशी युद्धे शांततेवाचून व शांतता युद्धावाचून अशक्यच असतात.
सामाजिक संवाद साधते ती भाषा
ही सामाजिक युद्धे सतत चाललेली असतात. त्यामुळे एकीकडे संस्कृती, सभ्यता यांचा वारसा सांगण्याची पद्धत व अहंकार; तसेच आपली अस्मिता व वेगळेपण जपण्यात धन्यता मानीत सामाजिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याचा दावा करण्याचा उघड प्रकार तर दुसरीकडे ही अशिष्ट भाषा, ही अमराठी, ही गांवढळ भाषा म्हणून हे लोकही तितकेच असंस्कृत असा प्रकार ! या भाषिक विचारसरणी सामाजिक विचारसरणीच असतात. त्यामुळे ‘प्रमाण भाषा’, ‘उत्तम मराठी’, ‘चांगली मराठी’, ‘सुसंस्कृत मराठी’ असे शब्दप्रयोग कानावर आदळतात, ज्याचे स्पष्टीकरण करणे आवाक्या-वाहेरचे असते. प्रमाण भाषा, उत्तम मराठी असे शब्दप्रयोग आले की, स्वाभाविकच इतर अभिव्यक्ती अप्रमाण, हिणकस ठरविण्याचा प्रयत्न होतो. सामाजिक दळणवळणातील हा अडसर सामाजिक संवादाला नेहमीच बाधा आणीत असतो, हे विसरून चालणार नाही. भाषा व्यवहार हा सामाजिक मने सांधणारा महत्त्वाचा दुवा आहे, हे दुर्लक्षिले गेल्यामुळे समाजगटात, अलिप्ततेची व दुराव्याची भावना निर्माण होते व ती जोपासलीही जाते. पुढे तर त्यात तीव्रताही निर्माण होण्याचा संभव असतो. समाजातील उच्च वर्गाची भाषा ही प्रमाण भाषा, सुसंस्कृत भाषा असा एक फसवा प्रचारही त्याला अनेकदा कारण ठरतो. याचा एक उलट परिणाम मी असा अनुभवला आहे की, अशिक्षित किवा तथाकथित खालच्या जातीतील लोकांना आपण बॉलतो त्या भाषेसंबंधी एक प्रकारचा अविश्वास वाटत असतो. आणि नंतर त्यांच्या मनात अकारण दुराव्याची, संकोचाची भावना बळावत जाते. भाषेसंबंधी ‘सटिफिकेट’ देण्याच्या प्रवृत्तीमुळे हा प्रकार घडत असतो, हे नाकारता येणार नाही. म्हणजे एकीकडे अहंगंड व दुसरीकडे न्यूनगंड अशी अवस्था एकच भाषा वापरणाऱ्या लोकांच्या संबंधाने निर्माण होताना दिसते. त्यामुळे भाषिक उद्दामपणा हा सांस्कृतिक उद्दामपणा ठरतो आणि भाषिक लाचारी ही सांस्कृतिक लाचारी ठरते. सवर्णीय पिता, आपल्या मुलाच्या अंगावरील मळकट कपडे पाहून जेव्हा ‘कसा म्हारड्यासारखा दिसतोस !’ किंवा ‘फाजील चांभारचौकशा करू नकोस’ म्हणून दरडावणारा प्रेमळ पिता आपल्या उच्च जातीय भावनांचेच प्रदर्शन करीत असतो. एखादा महार जातीतील लेखक ग्रांथिक भाषा बोलू लागला की, ‘कसा बामना-सारखा बोलतो’ असे व्यक्त झालेले मत कुठेतरी अपुरेपणाची बोचच प्रदर्शित करीत असते. मांग, बेरड या जातीसंबंधानेही असेच शब्दप्रयोग सहजतेने वापरले जातात. तुच्छता, उपहास किंवा अहंकार, उद्दामपणा ही भाषा-व्यवहाराची सहजमाध्यमे आपल्या समाजात अंगवळणी पडलेली दिसतात. त्यामुळे एका समाजगटाचे सामाजिक तथाकथित ‘उच्चत्व’ आणि इतर समाजासंबंधीची ‘हीन’त्वाची भावना सामा-जिक असंतुलनाचे पोषण करते, याचे आजही भान राखण्याची गरज आहे. साहित्य, बोलपट, अभ्यासक्रमाची पुस्तके, नभोवाणी किंवा दूर-दर्शन यासारख्या लोकजीवनाशी सतत संबंध असणाऱ्या माध्यमांचाही गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. कारण ही माध्यमे सामाजिक तणाव, अलिप्तता, दुरावा निर्माण करूही शकतात वा नष्टही करू शकतात.
वृत्तपत्रांची भूमिका
या संदर्भात आणखी एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे वृत्तपत्र Gunnar Myrdal या विख्यात विचारवंताने वृत्तपत्रासंबंधी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे: ‘The press is also the chief agency of group control’ (An American Dilemma p. 911) आज वहुसंख्य वृत्तपत्रे दलितेतरांची आहेत. दलितांची वृत्तपत्रे ही नेहमीच वळवाच्या पावसासारखी राहिलेली आहेत. या वृत्त-पत्रांची फारशी प्रतिमाही निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे या वृत्त-पत्रांची फारशी दखलही घेतली जात नाही. परंतु दलितेतरांची सर्वच वृत्तपत्रे दलितांच्या बाजूने आहेत असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. बहुसंख्य वृत्तपत्रे दलितविरोधी कशी आहेत हे वेगवेगळ्या आंदोलनांच्या वेळी प्रत्ययाला आल्याशिवाय राहिले नाही. मराठवाड्यात नामांतराच्या निमित्ताने जो उद्रेक झाला, त्यावेळी या भागातील काही वृत्तपत्रांनी, दलितांचे भीषण शिरकाण चालले असताही, त्यासंबंधी सौम्य धोरण आखलेले होते. त्यासंबंधी बातम्या देण्याचेही टाळले होते. परंतु एखाद्या दलितेतराच्या घरावर कुणी एखादा दगड फेकला की, त्यासंबंधीचे ठळक मथळे देऊन, यामागे दलितशक्ती उभी आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला. दलितविरोधी भूमिका घेतल्याने सबंध समाजातच तेढ निर्माण होत जाणे आणि त्यामुळे अलगतेची, तुटकपणाची भावना तीव्र होणे स्वाभाविक असतेः मराठी वृत्तपत्रांनी समाजातील असुरक्षिततेच्या भावनांना गोंजारणे नैतिकदृष्टीने कितपत बरोवर आहे ? पुष्कळदा मूळ प्रश्न बाजूला राहून अस्थिरता निर्माण होण्यात त्याचे पर्यवसान होते. सामाजिक अभिसरणाच्या नीतीशास्त्राची चिरंतन मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही जर आपण मान्य केली तरच सामाजिक स्वास्थ्याचा विचार केल्यासारखे होईल. वृत्तपत्रे या विचारांचे निश्चितपणे सारथ्य करू शकतील असे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. मराठी भाषा ही लोकभाषा असेल तर सामाजिक अभिसरणाच्या महायात्रेत तिने अंगावरची खोट्या प्रतिष्ठेची झूल झुगारून दिली पाहिजे. ज्या ज्या साधनांच्या माध्यमातून ती व्यक्त होते; ती सर्व साधने पराभूत झालेली आहेत, याची जाणीव डोळसपणे जोपासल्याशिवाय सामाजिक अभिसरण, सामाजिक संवाद हे शब्द केवळ कोशातच राहतील.