नागपूर :- आंबेडकरी कवी, लेखक, समीक्षक, संशोधक महेंद्र गायकवाड यांना त्यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मुलाखती’ या वैचारिक संशोधन ग्रंथासाठी परिवर्त संस्थेतर्फे २०२३साठीचा ‘स्मृतिशेष राजा ढाले राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ५ नोव्हेंबर रोजी आयोजित परिवर्त परिषदेत प्रसिद्ध हिंदी साहित्यिक बजरंग बिहारी यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
महेंद्र गायकवाड यांची १५ पुस्तके प्रकाशित असून त्यात कवितासंग्रह, कथासंग्रह, समीक्षाग्रंथ, संशोधनात्मक पुस्तके तसेच संपादनांचा समावेश आहे. गायकवाड यांना अलिकडेच डब्लूसीएलतर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महेंद्र गायवाड यांचे वैचारिक संशोधन असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मुलाखती’ या ग्रंथाचा हिंदी अनुवाद लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यांचे ‘अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे दहा अध्यक्षीय भाषणे’ हे पुस्तक विशेष चर्चिले जात आहे. गायकवाड यांना आजवर विविध संस्था-संघटनांतर्फे विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी एमफिल, पीएचडी प्राप्त केली असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. गायकवाड यांना जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे त्यांच्या साहित्याच्या चाहत्यांनी स्वागत केले आहे.