दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य अन् आनंदाश्रू

नागपूर :-  निसर्गतः मिळालेल्या शारीरिक मर्यादेवर मात करण्याची पूरक अशी शक्ती परमेश्वरानेच सर्वच दिव्यांग बांधवांना दिलेली असते. फक्त त्यांना कुणीतरी आपल्या पाठीशी आहे, एवढा विश्वास दर्शविण्याची गरज असते. एकदा हा विश्वास त्यांना मिळाला तर ते संपूर्ण जग जिंकण्याच्या मार्गावर यशस्वीपणे प्रस्थान करतात. याची प्रचिती नागपूर महानगरपालिकद्वारे केल्या जात असलेल्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरण कार्यातून येत आहे. दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर खुलणारे हास्य आणि नकळत डोळ्यातून झळकणारे आनंदाश्रू हे या कार्याची पोहोचपावती म्हणावी लागेल.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय अंतर्गत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप- असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपुरात दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित केल्या जात आहेत.

ज्यांना हात नाही, पाय नाही, पण मनातून थेट गरुडझेप घेण्याची इच्छा आहे. अशांना सक्षमपणे उभे करण्याचे कार्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनातून केल्या जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांच्या जीवनात सुकर आनंद देण्यासाठी संपूर्ण प्रशासन तत्परतेने कार्यरत असून, ज्येष्ठ आणि दिव्यांगांचे जीवन आनंदाने फुलून यावे हाच या उपक्रमाचा प्रयत्न आहे. यामाध्यमातून लाखो ज्येष्ठ आणि दिव्यांग बांधवाना गगनभरारी घेण्याचे बळ मिळाले आहे.

जागनाथ बुधवारी येथील रहिवासी ६ वर्षीय मंथन रोशन रंगारी याला जन्मापासून पाय नाही. अशा मंथन चे पालन पोषण करण्याचे आव्हान कुटुंबीयांपुढे होते. चिमुकल्या मंथनला पाया अभावी स्वतः हुन कुठे येजा करता येत नाही. त्याच्या सतत कुणाला तरी नेहमी सोबत असायला हवं, पण आता मंथनला या शिबिराच्या माध्यमातून व्हील चेअर देण्यात आली आहे. जेणेकरून मंथन आता स्वतःहून भ्रमंती करू शकेल. याशिवाय त्याला टेबल आणि संगणक ही देण्यात आले आहे, ज्यामुळे आता मंथन आपल्या जीवनाचा मार्ग निश्चित करू शकेल. त्याला शिक्षण घेता येईल. इवल्याशा वयात तो यशाचे शिखर गाठण्याचे स्वप्न बघून, त्या स्वप्नांना मूर्तीरूप देण्याच्या मार्गावर अग्रेसर होईल.

तसेच जन्मतः हात पाय लुळे असणाऱ्या पाचपावली येथील रहिवासी २८ वर्षीय शुभम तुमाने यांना ही व्हील चेअर देण्यात आली आहे. या व्हील चेअरच्या मध्यमातून शुभम स्वतःहून कुठेही येजा करू शकेल. त्यांच्या जीवनात आनंद बहरून येईल. शिबिराच्या माध्यमातून अनेक उपयोगी वस्तूंचे वितरण केल्या जात आहेत. दैनंदिन वापरासाठी या वस्तूंचे अत्यंत गरजेच्या असल्याचे मत शिबिरातील लाभार्थी तांडापेठ रहिवासी लिलाबाई उमरेडकर यांनी व्यक्त केले. तसेच शासनाच्या या शिबिरामुळे आम्हाला म्हातारपणात आधार मिळाला आहे. ज्या वयात चालायला अडचण होते, अशा वेळी व्हील चेअर मिळाल्यामुळे आनंदी असल्याची प्रतिक्रिया आग्याराम देवी चौक, गणेशपेठ रहिवासी लाभार्थी सीमाबाई झाडे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठांसह दिव्यांगांना मदत होईल असे हे शिबीर ठरले आहे. येथे वितरित केल्या गेलेल्या वस्तूंमुळे आधार मिळाला, आपलीही मदत कुणीतरी करताय हे बघून खूप समाधानी असल्याची प्रतिक्रिया लाभार्थी नामदेव बोकडे यांनी व्यक्त केली, याशिवाय शिबिरातून मिळालेल्या वस्तूंमुळे आयुष्यभर कष्ट करून आता म्हातारपण सोयीस्कर जाईल असे मत ज्येष्ठ लाभार्थी सरस्वती बोकडे यांनी व्यक्त केले. आम्हाला लवकरच बस द्वारे निःशुल्क धार्मिक यात्रा करत येईल, त्यामुळे पुढील आयुष्य सुकर होईल अशी भावना महाल रहिवासी रत्नमाला इंगळे यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Tue Sep 20 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.19) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!