कोराडी औष्णिक वीज केंद्र
भुषण चंद्रशेखर यांच्या पाठपुराव्याला यश
नागपूर :-३x६६० कोराडी वीज केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात मागील चार वर्षांपासून कार्यरत सहा कंत्राटी कामगारांना १० जून २०२२ पासून मे. क्रिस्टल इंटरप्राइजेस या कंत्राटदाराने चालू कामावरून कमी केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे भुषण चंद्रशेखर यांनी कोराडी वीज प्रशासनाकडे नियमितपणे पाठपुरावा केला. कोळसा हाताळणी विभाग व कोराडी प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षकेंद्रित करून कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीने न्याय दिला आहे. कंत्राटी कामगार सुरेंद्र भागचंद समरीत, सुमित अशोकराव इंगोले, रोशन पांडुरंग गजभिये, महेश रामदास दमके, संतोष विदेशी गुप्ता, मनीष विनोद जस्सल या सहा कामगारांना कामावर पूर्ववत रुजू करण्यात आले असून नव्याने कंत्राटदार मे. पंचकृष्णा इलेक्ट्रिकल अँड इंटरप्राइजेस यांच्या अखत्यारीत कामगारांना प्रवेशपत्र दि.१६ डिसेंबर २०२२ पासून मिळाले आहे. संबंधित कंत्राटदाराने १ जानेवारी २०२३ पासून सिलींग तोडण्याच्या कामावर पूर्ववत रुजू केले आहे.
या कामगारांना सहा महिन्यापूर्वी चालू कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. १००% न्याय मिळेल या आशेने त्यांनी राष्ट्रवादीचे तडफदार युवा नेतृत्व भुषण चंद्रशेखर यांचेकडे धाव घेतली. हे कामगार खाणीतून कोळसा घेऊन येणाऱ्या ट्रकवरील सीलिंग तोडण्याची कामे मागील चार वर्षांपासून करत होते.
महानिर्मिती मध्ये “कंत्राटदार बदलेल पण कामगार बदलणार नाही” अशी नियमावली असतांनाही कंत्राटी कामगारांची पिळवणूक व छळ होतो. शासकीय औद्योगिक आस्थापनामध्ये मनुष्यबळ पुरविणे संबंधी कामात कंत्राटी कामगारांना किमान वेतन व भत्यांपासून दूर ठेवणे, वेळेत वेतन न करणे, बँकेमार्फत वेतन न करणे, पी.एफ. व इएसआयसी न भरणे अशा कंत्राटदारांची बिले पास होतात कशी? हा चौकशीचा भाग आहे. अशा कार्यशैलीमुळे महानिर्मिती वारंवार लोकनिंदेला बळी पडते. कोराडी वीज केंद्रात कार्यरत कंत्राटी कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवून न्याय देणे वरीष्ठ अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. पण कंत्राटदार हा कामगारांपेक्षा श्रेष्ठ असल्याची भावना येथील कामगार विभागाची असल्याने कामगारांना नेहमी संघर्ष करावा लागतो. पण कामगारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र आमची धडपड सुरू आहे. असे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले.
“”किमान वेतनात हेराफेरी करणे हा कंत्राटदारांचा व्यवसाय आहे. कामगाराने आवाज उठवला की त्याला कामावरून कमी केले जाते. हा गोरखधंदा बंद सुरू आहे. महानिर्मितीने गांभीर्याने लक्ष द्यावे. न्याय मिळवून देणे हीच आमची भूमिका.”
– भुषण चंद्रशेखर जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर (ग्रा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष