– विश्व सिंधी साहित्य संमेलनाचे आयोजन
नागपूर :- संघटना, सिद्धांत आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्यावर सिंधी समाजबांधवांनी भर दिला. या समाजाला संस्कारित करण्यामध्ये सिंधी साहित्याचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.
सीताबर्डी येथील माहेश्वरी भवन सभागृहात विश्व हिंदी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक घनश्याम कुकरेजा, वीरेंद्र कुकरेजा, उदयलाल, अशोक रुहानी आदींची उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘आपल्या देशाची संस्कृती, ऐतिहासिक वारसा हे खूप मोठे संचित आहे. ‘अनेकता में एकता’ असे आपल्या देशाच्या बाबतीत बोलले जाते. यामध्ये साहित्य, कला, संस्कृतीचे मोठे योगदान आहे. सिंधी साहित्याचा सिंधू आणि हिंदू या दोन्ही शब्दांशी थेट संबंध आहे. सिंधी साहित्याने वारश्याचे जतन केले. पिढी बदलली तरीही आज नव्या पिढीवर सिंधी संस्कृतीचे संस्कार आहेत. त्यात साहित्याचे मोठे योगदान आहे.’ साहित्य हे भूतकाळातील अनुभवांमधून भविष्याची प्रेरणा देत असते. परिवर्तन घडवून आणत असते. व्यक्तिमत्व घडविण्याची शक्ती साहित्यात आहे. ही शक्ती सर्वव्यापी करणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.