– मनपाच्या आवाहनावर क्षयरोग दिनी संकल्प
नागपूर :- श्री भवानी हॉस्पीटल, पारडी आणि असोसिएशन ऑफ चॅरीटेबल हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी २४ मार्च २०२५ रोजी जागतिक क्षयरोग दिवस श्री भवानी रुग्णालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या वतीने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी क्षयरुग्णांच्या सहकार्यासाठी समाजातील सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत श्री भवानी हॉस्पीटल संस्थेने ५० क्षयरुग्णांना दत्तक घेण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाला श्री भवानी हॉस्पीटलचे अध्यक्ष पांडुरंग मेहर, महासचिव जगदीश गुप्ता, हॉस्पीटलचे अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. कौस्तुभ उपाध्ये, एसीएच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास शेंडे, क्षयरोग विभाग प्रमुख डॉ. राहुल कुंगवानी, दळवी हॉस्पीटलचे डॉ. कोमेजवार, मनपाचे उत्तम मधुमटके, पंकज पाठक, लक्ष्मी पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी क्षयरोगाबद्दल सुरु असलेल्या उपाययोजना व क्षयरोग कसा टाळता येईल यावर महाराष्ट्र शासन व नागपूर महानगरपालिका कसे कार्य करीत आहे यावर मार्गदर्शन केले. सामाजातील प्रत्येक व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी आपली जबाबदारी समजून क्षयरुग्णांचे उपचार आणि योग्य आहारासाठी क्षयरोग पिडीतांना दत्तक घेतल्यास क्षयरोगींचे प्रमाण कमी करता येईल, असे आवाहन यावेळी केले. या आवाहनाला साथ म्हणून ५० क्षयरोगींना दत्तक घेण्याचा संकल्प संस्थेद्वारे करण्यात आला. या संकल्पाचे नागपूर महानगरपालिकेद्वारे स्वागत करण्यात आले.
श्री भवानी हॉस्पीटलच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांनी क्षयरोगाविषयी होणारा निष्काळजीपणा यावर भर दिला व मार्गदर्शन केले. एसीएच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास शेंडे, यांनी शारिरीक, मानसीक, सामाजिक, आध्यात्मिक, शौक्षणिक आणि पर्यावरण यांचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर कसा होतो हे समजावून सांगितले.
श्री भवानी हॉस्पीटल येथील क्षयरोगविभाचे प्रमुख डॉ. राहुल कुंगवानी “End TB Strategy” २०३५ पर्यंत क्षयरोगाचा प्रादुर्भाव संपविण्याचे उद्दिष्ट व मृत्यूदर कसे कमी करता येईल, लोकांनी कशी काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन श्री भवानी रुग्णालयाचे सचिव श्री नितीन अरासपुरे यांनी केले व त्यांनी शेवटी आभारही मानले.
कार्यक्रमाला तसेच संस्थेचे सर्वश्री हरिदास वाडीभस्मे, मिलींद ठवकर, दिवाकर धोपटे, नरेश मिगलानी, अशोक अंबागडे, रवि कैकाडे, देवेन्द्र टावरी, मनिष केडीया व श्री भवानी रुग्णालयाचे कर्मचारी व रूग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.