-युवतीने सोडले घर
नागपूर :-ती एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. मात्र, पालकांची इच्छा काही वेगळीच आहे. यावरून घरी नेहमीच शाब्दिक वाद व्हायचे. सततच्या वादाला कंटाळून तिने घर सोडले. दक्षिण एक्सप्रेसने निघाली. पालकांनी तिचे छायाचित्र पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविले. लोहमार्ग पोलिसांनी शोध घेऊन तिला आजीच्या स्वाधीन केले. हा प्रकार सोमवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला.
हैदराबादची सिम्मी (काल्पनिक नाव) सुशिक्षित आणि सुसंपन्न घरातील आहे. ती अभ्यासात अत्यंत हुशार आहे. बारावीत तिला 95 टक्के गुण मिळाले. वडील आयटी इंजिनीअर आहेत. पोलिस अधीक्षकांची ती नातेवाईक आहे. तिला एमबीबीएस डॉक्टर व्हायचे आहे. मात्र, नीट परीक्षेत तिला अपेक्षित गुण मिळणार नाही आणि ती एमबीबीएस प्रवेशापासून वंचित राहील, अशी तिला भीती आहे. परंतु, डॉक्टर व्हायचेच असा तिचा निर्धार आहे. मात्र, कुटुंबीयांची वेगळीच अपेक्षा आहे. यावरून आई-वडिलांचे मत विभागले. त्यांच्यात नेहमीच शाब्दिक वाद व्हायचे. सततच्या वादाला कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
रविवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ती घरून निघाली. विमानाने प्रवास करीत असल्याने तिला रेल्वेविषयी माहिती नाही. मेट्रोने ती सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पोहोचली. सिकंदराबाद-दिल्ली दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल कोचने ती प्रवासाला निघाली. ती आजीकडे दुर्गला जात होती. बराच वेळ होऊनही सिम्मी घरी परतली नाही. त्यामुळे पालक चिंतेत पडले. त्यांनी सर्वत्र विचारपूस केली. सर्वत्र शोध घेतला. फोन केला. मात्र काहीच ठोस हाती लागले नाही. रात्र झाल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.
सिम्मीचे मामा पोलिस अधीक्षक आहेत. त्यांच्या माध्यमातून ही माहिती लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांना मिळाली. सोबतच सिम्मीचे छायाचित्र व्हॉट्सअॅपवर पाठविले. काशिद यांनी सिम्मीचे छायाचित्र पोलिसांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविले. हैदराबादकडून येणारी प्रत्येक गाडीची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान ती दक्षिण एक्सप्रेसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एएसआय विजय मरापे, आम्रपाली रोडगे, प्रणाली चातरकर, भूपेश धोंगळी आणि सोलंकी यांनी दक्षिण एक्सप्रेसमधून तिला उतरविले.
सिम्मी आजीच्या स्वाधीन
एपीआय दयानंद सरोदे दक्षिण एक्सप्रेसनेच प्रवास करीत होते. त्यांनाही छायाचित्रासह सिम्मीचा मॅसेज मिळाला. त्यांनी गाडीत शोध घेतला. ती जनरल डब्यात दिसली. त्यांनी तिचे छायाचित्र काशिद यांना पाठविले. खात्री करून घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांनाही छायाचित्र पाठविले. होकार मिळताच फलाट क्रमांक एकवर पोलिस सज्ज झाले. नागपूर स्थानकावर गाडी थांबताच तिला ताब्यात घेण्यात आले. काशिद यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. तिने घर सोडण्याचे कारण सांगितले. चहा-पाणी दिल्यानंतर तिच्या आजीला माहिती देण्यात आली. आजी लोहमार्ग ठाण्यात पोहोचली आणि सिम्मीला घेऊन गेली.