-त्यांच्या स्वप्नाचा झाला चुराडा
– पोलिसांच्या सतर्कतेने मुलगी सुरक्षित
नागपूर :- एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले आणि लग्नाचे आमिष दाखवून रेल्वेने अपहरण केल्याची घटना सोमवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले असून अल्पवयीन मुलीला शासकीय वसतिगृहात पाठविले. या घटनेची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना दिली.
राणी आणि राजेश (काल्पनिक नाव)अशी त्यांची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले. सध्या राजेश हैदराबाद येथील एका कंपनीत काम करतो. उत्तर प्रदेश पोलिस ठाण्यात राजेश विरूध्द अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार राणी ही अल्पवयीन (17) तर राजेश 20 वर्षाचा आहे. एकाच परिसरतील असल्याने त्यांची तोंड ओळख होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि मैत्री प्रेमात बदलण्यात वेळ लागला नाही. राजेश हैदराबादला असल्याने राणीशी भेट होत नव्हती. केवळ मोबाईलवरच त्यांचे बोलणे व्हायचे. हा दुरावा त्यांना सहन होत नव्हता. त्यामुळे त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ठरल्या प्रमाणे रविवारच्या रात्री दोघेही घरून निघाले. नागपुरला जाणार्या रेल्वे गाडीत बसले. ही गाडी सोमवारी दुपारच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर आली. दोघेही प्लॅटफार्म क्रमांक 1 वर होते. सायंकाळच्या गाडीने ते हैदराबादला जाणार होते.
कर्तव्यदक्ष जवानाचा संशय बळावला
गस्तीवर असलेले आरपीएफ जवान व्ही. पी. सिंग यांचे लक्ष त्या दोघांकडे गेले. संशय बळावल्याने त्यांना ठाण्यात आणून सखोल चौकशी केली. राणी अल्पवयीन असून लग्न करण्यासाठी घरून पळ काढल्याचे समजले. त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनात लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.
उत्तर प्रदेश पोलिसांशी साधला संपर्क
लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस कर्मचारी नाजनीन पठाण चौकशीचे आदेश दिले. पठाण यांनी राणीची आस्थेने विचारपूस केली. तेव्हा सारा प्रकार लक्षात आला. काशीद यांनी संबधीत पोलिस ठाण्यात फोन करून विचारले असता, राजेशवर अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी राणीला शासकीय वसतिगृहात पाठविले असून राजेशला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिस नागपुरसाठी रवाना झाले.