येवला (नाशिक) येथे राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ शरद पवार फोडणार ;महेश तपासे यांची माहिती…

– नाशिककडे जाताना ठाणे – भिवंडी – शहापूर मार्गावर शरद पवारांचे जंगी स्वागत करण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आखणी…

मुंबई  :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज ८ जुलैला नाशिकच्या येवला इथून राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फोडणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी माध्यमांना दिली.

राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून या वडीलरुपी नेत्याने महाराष्ट्राचा दौरा करावा हा आग्रह केला. त्यानुसार आज शनिवार दिनांक ८ जुलै रोजी नाशिक जिल्हयाचा दौरा जाहीर केला आहे. सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन शरद पवार निघतील. शरद पवार यांचे ठाणे, भिवंडी, पडगा, शहापूर, इगतपुरी यामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जोरदार स्वागत करणार आहेत असेही महेश तपासे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस ही कार्यकर्त्यांची आहे. त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. पदावर नुसती नियुक्ती जाहीर करुन होत नसते तर त्यासाठी क्रियाशील सदस्यांची बैठक घ्यावी लागते त्यामध्ये ठराव घ्यावा लागतो. त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होते. प्रफुल पटेल यांनी सुनील तटकरे यांची निवड केली ती स्वतः केली. त्यांची क्रियाशील सदस्यांची बैठक झाली नाही. आणि काल राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली त्यामध्ये २४ प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसा ठरावही झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

देशपातळीवर अनेक नेत्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. स्वतः राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आता बंगळुरूमध्ये होणार्‍या विरोधी पक्षांच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली.

नियमबाह्य काय आहे हे जनता ठरवू दे त्यांनी सांगून काही होत नसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  आहेत. २४ राज्यामध्ये पक्षाचा विस्तार आहे. अनेक ठिकाणी निवडणूक लढवली आहे. महाराष्ट्रात काही आमदारांच्या सह्या घेऊन स्वतः ला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करु शकत नाही. केरळमध्ये आमदार आहेत तिथे सरकारमध्ये प्रतिनिधी आहेत. लक्षद्वीपमध्ये खासदार आहे. नागालँडमध्ये आमदार आहेत. या सर्वांनी शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष अशी घोषणा केली व तसा ठरावही केला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

एकाच कुटुंबातील लोक एकत्र येत असतील तर आनंद आहे परंतु कुटुंब फोडण्याची परंपरा ही भाजपची आहे हे सर्वांना चांगलेच माहीत आहे असा टोला महेश तपासे यांनी दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाजपला लगावला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एचसीएल राष्ट्रीय क्वॉलिफाईंग टूर्नामेंट करिता मनपाच्या विद्यार्थ्यांची निवड चाचणी मंगळवारी

Sat Jul 8 , 2023
– कबड्डी व फुटबॉलच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्वाची संधी नागपूर :- एचसीएलर्फे घेण्यात येणा-या राष्ट्रीय क्वॉलिफाईंग टूनॉमेंटमध्ये सहभागी होण्याकरिता मनपाच्या १७ वर्षाखालील फुटबॉल व कबड्डी चमूची निवड चाचणी मंगळवारी ११ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. स्व. रा.पै. समर्थ स्टेडियम (चिटणीस पार्क) येथे सकाळी ९ वाजता ही निवड चाचणी होणार आहे, अशी माहिती मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी दिली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com