– महसूल सप्ताहाचा शुभारंभ
भंडारा :- समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा- सुविधा देण्याची जबाबदारी महसूल विभागाने स्मार्ट पद्धतीने पार पाडावी ,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आज व्यक्त केली. नियोजन सभागृहात आयोजित महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते.
आजपासून महसूल सप्ताहाला सुरूवात झाली असून या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी 5.30 ते 6.30 च्या दरम्यान ऑफीसर क्लब येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या योगासने व व्यायामाने सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्यासह अनेक कर्मचा-यांनी यात सहभाग घेतला.
आजच्या कार्यक्रमांमध्ये महसूल विभाग अंतर्गत वेगवेगळ्या बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण 32 अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर जिल्हाधिकारी विंचनकर,निवासी उप उपजील्हाधिकारी लीना फलके, उपजिल्हाधिकारी मोरे, विजया बनकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अभय नावंदर,पोलिस विभागाचे बागुल,उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विंचनकर ,तहसीलदार टेळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. काल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी महसूल सप्ताह आयोजनामध्ये कल्पक उपक्रम राबविण्याची सूचना केली होती.
त्याचाच एक भाग म्हणून आजपासून 21 ऑगस्टपर्यत योगासने व प्राणायमाचा निशुल्क वर्ग आयोजित करणयात आला आहे. उद्या 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा उपक्रम – या कार्यक्रमात अतिवृष्टी, पूर, नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्यांना मदत देण्यात येणार आहे.4 ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमात अपील निकाली काढण्यात येतील. सलोखा योजनेबाबत कार्यवाही सोबत आपले सरकार पोर्टलवरील प्रकरण निकाली काढण्यात येतील.
5 ऑगस्ट रोजी महसूल अदालतील अतिदुर्गम भागातील नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांचे दाखले, प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. 6 ऑगस्ट रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विरमाता व विरपत्नी तसेच माजी सैनिक यांचे महसूल विषय प्रश्नांवर कार्यवाही, 7 ऑगस्ट रोजी समारोपीय कार्यक्रमात सप्ताहात केलेल्या कार्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
तसेच सर्व अधिकारी –कर्मचा-यांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.त्यात बीपी, शुगर व अन्य आरोग्य तपासण्या करण्यात येईल.