– स्वीप अंतर्गत महिला बचत गटांची बैठक
नागपूर :- नागपूर शहरातील सहाही विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे याकरिता स्वयंसहायता गट, महिला बचत गटांच्या सदस्यांनी पुढाकार घेत मतदार जनजागृती कार्यक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले.
सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे शहरातील विविध स्वयंसहायता गट, महिला बचत गटांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी महिला बचत गटाच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी विजय त्रिकोलवार श्रीमती नूतन मोरे यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्यता प्रामुख्याने उपस्थित होत्या.
मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरातील मतदानाचा टक्का वाढावा याकरिता महिलांची महत्वाची भूमिका असणार आहे. बचत गटाच्या महिलांचा दररोज नागरिकांशी थेट संपर्क असतो त्यामुळे त्यांनी केलेल्या मतदानाच्या आवाहनाला महिला थेट प्रतिसाद देऊ शकतात. तरी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे याकरिता मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढकार घ्यावा व मनपाद्वारे स्वीप अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा.असे आवाहन डॉ. लाडे यांनी केले.