यवतमाळ :- समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा व जीवन कौशल्य प्रशिक्षणांतर्गत कळंब पंचायत समितींतर्गत उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींना स्व-संरक्षण प्रशिक्षण तसेच मानसिक, बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी, संकटाच्या आणि असुरक्षिततेच्या वेळी स्वतःचे रक्षण करण्यासाठी ९ जानेवारीपासून ज्युडो कराटेच्या माध्यमातून आत्मसंरक्षाचे धडे देण्यात येत आहे.
कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना स्वयं-कौशल्य पारंगत करणे व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागरूकता निर्माण करून मुलींना शाळेमध्ये प्रात्याक्षिकांद्वारे माहिती व प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक शाळेत तालुका समन्वयक तितीक्षा डंभे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षक वैभव कदम, ऋतुजा कठाणे, अमोल नगराळे, दीप्ती नीत, तृष्णा मलकापूरे, धनंजय मिसाळ आदी विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देत आहे.
कळंब पंचायत समितींतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी केंद्र शाळा कात्री, कळंब, कोठा, सावरगाव नांझा, जोडमोहा केंद्रातील एकूण ४४ शाळांमध्ये नियमित प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या २३ मार्चपर्यंत हे प्रशिक्षण वर्ग चालणार आहे. या प्रशिक्षणात विद्यार्थिनींना स्वसंरक्षण आणि आपल्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला त्यावेळी प्रत्युत्तर कसे द्यायचे याचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढला आहे. घराबाहेर पडताना सदैव सतर्क राहावे. अनोळखी व्यक्तींपासून अंतर राखावे आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवावे, याचेही धडे प्रशिक्षणात दिले जात आहे. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच स्वयंसिद्धा यवतमाळ जिल्हा समन्वयक स्नेहल बोरकर, पालक व विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे कौतुक केले.