संदीप बलविर, तालुका प्रतिनिधी
चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत
डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेची यादी रखडली
विध्यार्थ्यांच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसण्याचा मानस
पालक कर्जबाजारी,विद्यार्थी चिंताग्रस्त
नागपूर/२५ डिसें:- अनुसूचित जाती,नवबौद्ध व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देता यावे म्हणून समाजकल्याण विभागाने डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या माध्यमातून दहावीच्या परीक्षेत ९०% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना “भारतरत्न” डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू केली होती.
या योजनेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी दोन लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचा गाजावाजा तत्कालीन समाजकल्याण मंत्री यांनी केला.मात्र तब्बल दीड वर्षाचा कालावधी उलटूनही आजपावेतो जवळपास चार हजार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा एक दमडीही न मिळाल्याने समाजकल्याण विभाग व शासनाकडून विद्यार्थ्यांच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसण्याचा प्रकार सुरू असल्याचे सध्याघाडीला दिसून येत आहे.
महत्वाची बाब अशी की,विद्यार्थ्यांना “भारतरत्न” डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेअंतर्गत व्यावसायिक व उच्च शिक्षणा करीता दोन लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याने या योजनेसाठी राज्यभरातील चार हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले.मात्र बार्टी ने गेल्या वर्षभरापासून लाभार्थ्यांची यादी जाहीर न केल्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त आहे.शासन शिष्यवृत्ती देऊन शैक्षणिक खर्च भागविणार असल्याच्या आशेने विद्यार्थ्यांनी महागड्या कोचिंग लावल्या आहे.परंतु आता शासन किंवा बार्टी पैसे देत नसल्याने कोचिंग वाल्यांना फिस द्यायची कशी? असा प्रश्न आ वासून पालकांना पडला आहे.तर अनेक पालकांनी सावकारांकडून कर्ज घेतल्यामुळे ते कर्जबाजारी झाले आहे.
विशेष बाब अशी की,महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जातीचे १९ आमदार आहे.त्यांनी तरी देशाचे भवितव्य व उद्याच्या सुजाण नागरिकांना घडविण्यासाठी निद्राधीन असलेल्या समाजकल्याण विभाग व बार्टी ला कुंभकर्णी निद्रेतून जागे करावे अशी सर्वसामान्य पालकांची मागणी असतांना हेच अनुसूचित जातीचे १९ आमदार मूग गिळून बसल्याचे भयावह चित्र दिसत आहे.
@फाईल फोटो