– ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर :- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातीयवाद, अस्पृश्यता याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली. त्यांच्या प्रत्येक विचाराला विज्ञानाचा आधार होता. त्यांनी हिंदुत्व आणि हिंदू जीवनपद्धतीची मांडणी मानवतेच्या सिद्धांताच्या आधारे केली, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ या डॉ. उदय निरगुडकर अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ अभ्यासक उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर’ या इंग्रजी ग्रंथाचा हा मराठीत अनुवाद आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्रीधर पराडकर, डॉ. उदय निरगुडकर, विदर्भ प्रांताचे अध्यक्ष लखनसिंह कटरे, कार्याध्यक्ष अविनाश पाठक, नितीन केळकर, सचिन नारळे, राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि स्वावलंबनाचा विचार मांडला. पण आजही समाजात हिंदुत्व, हिंदू धर्म, हिंदू जीवन पद्धतीबद्दल गैरसमज आहेत. दुर्दैवाने सावरकरांचे विचार लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्यात आपल्याला यश आले नाही, अशी खंत ना. गडकरी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या परिवाराने देशासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
डिजीटल माध्यम स्वीकारा
सावरकरांवरील हे पुस्तक साधे नाही. याला सैद्धांतिक आधार आहे. यामध्ये अभ्यास करून मांडलेले इतिहासातील दाखले आहेत. पण, नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवायचे असेल तर आता डिजीटल माध्यम स्वीकारण्याची गरज आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या नावाने अॅप तयार करून त्यावरून या पुस्तकातील छोटे छोटे प्रसंग तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा विचार करावा, असे आवाहन ना. गडकरी यांनी लेखकांना व प्रकाशकांना केले.