– ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे वाटप
भंडारा :- मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे. माझा मतदारसंघ माझे सदस्यत्व शिक्षणाशी संबंधित असल्याचे दर्शवितो. त्यामुळे मिळणारा आमदार निधी हा शैक्षणिक उद्देशासाठीच खर्च व्हावा, असा संकल्प विजयी झाल्यानंतर केला होता. ह्या संकल्पपूर्तीसाठी दरवर्षी माझ्या मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात माझा आमदार निधीच्या माध्यमातून ग्रंथालयांना सध्याच्या काळात आवश्यक असलेली पुस्तके आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि संगणकीय ज्ञानात भर पडावी या उद्देशाने संगणक वाटप करीत आहे. मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. माझा निधी ज्ञानवृद्धीसाठी खर्च होत आहे, याचे समाधान असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद तथा आमदार अभिजित वंजारी यांनी केले.
येथील नियोजन भवनात शुक्रवारी (ता. 11) आयोजित ‘कर्तव्यपूर्ती सोहळ्या’त ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अभिजित वंजारी यांच्यासह भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कविता उईके, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, जि.प. सभापती नरेश ईश्वरकर, जयश्री बोरकर, ॲड. शफीभाई लद्दानी, धनंजय तिरपुडे, योगराज झलके उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, शहरी भागात शिक्षणाच्या उत्तम सोयी आहेत. मात्र ग्रामीण भागात आजही हव्या तशा सोयी नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. आजचे जग तंत्रज्ञानाचे आणि स्पर्धेचे आहे. तंत्रशिक्षणाच्या किंवा संगणक शिक्षणाच्या मूलभूत सोयी ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. गावातील मुलांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. ही गरज ओळखून ग्रामीण भागातील शाळांना संगणकीय शिक्षणाच्या दृष्टीने बळकट करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. शिवाय ग्रंथालयात गेल्या कित्येक वर्षांपासून तीच ती जुनी पुस्तके आहेत.
आजच्या काळाची गरज ओळखून जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, युवांसाठी करियरच्या नव्या संधी आणि वाटा या विषयावरची अर्थात आधुनिकतेची गरज ओळखून आवश्यक असलेली पुस्तके जिल्ह्यातील ग्रंथालयांना उपलब्ध व्हावीत हा या उपक्रमामागील विचार असल्याचे त्यांनी सांगितले. संग़णक आणि पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांनी करावा, ही आता शिक्षक आणि ग्रंथालयांची जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार अभिजित वंजारी यांच्या हस्ते शाळांकडून उपस्थित प्रतिनिधींना 18 संगणकांचे वाटप करण्यात आले. तर जिल्ह्यातील 15 ग्रंथालयांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. एका शाळेला डिजिटल बोर्ड प्रदान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे यांनी केले. यावेळी शाळांतील शिक्षक, कर्मचारी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.