– मराठा, कुणबी युवक व नवउद्योजकांना इनक्युबेशन केंद्रांद्वारे प्रशिक्षण
नागपूर :- राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षीत गटातील तरुण विद्यार्थी व नवउद्योजकांना स्टार्टअप्स उभारण्यासाठी येथील जी.एच. रायसोनी टेक्नोलॉजी बिझनेस इंक्युबेटर फाऊडेशन (जीएचआरटीबीआयएफ), नागपूर व आय.आय.एम फाऊडेशन फॉर इंटरप्रनरशिप डेव्हलपमेंट (आयएनएफईडी) इनक्युबेशन केंद्राद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. या केंद्रांना सारथी पुणेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी नुकतीच भेट दिली.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मार्फत ‘सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास’ (इनक्युबेशन) उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षीत गटातील तरुण विद्यार्थी व नवउद्योजकांच्या स्टार्टअप्स सुरु करण्यासाठी एक वर्षाकरिता 25 हजार रुपये प्रती महिना आर्थिक सहाय तसेच व्यवसाय कल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी इनक्युबेशन केंद्रांमध्ये मार्गदर्शन, कार्यालयीन जागा , तंत्रज्ञान, प्रशासकीय सहाय्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येते. हा उपक्रम नागपूर विभागात जीएचआरटीबीआयएफ मध्ये राबविण्यात येत आहे. सद्य:स्थितीत पाच नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्यात येत असून आणखी पाच नवउद्योजकांना प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. तर आयएनएफईडी या केंद्रांमार्फत दहा नवउद्योजकांना प्रशिक्षण देण्याचे विचाराधीन आहे. या पार्श्वभूमीवर 19 डिसेंबर 2024 रोजी काकडे यांनी या उभय केंद्रांना भेट दिली.
या भेटी दरम्यान, जीएचआरटीबीआयएफ येथे पाच नवउद्योजकांच्या स्टार्टअप्सची काकडे यांनी प्रगती बघितली व शुभेच्छा दिल्या. तसेच आयएनएफईडी ला भेट देवून येथे प्रशिक्षण घेत असलेल्या नवउद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक (सांख्यिकी) भिष्म बिरादार, जीएचआरटीबीआयएफ प्राचार्य डॉ.सचिन उंटवाले, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशाल कटारे, आयएनएफईडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी धवड व सारथीच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.