तिनही एजन्सींसोबत शनिवारी बैठक
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने नागपूर शहराचे माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी विद्यापीठाचे मा. कुलगुरू सुभाष चौधरी यांची बुधवारी (ता.१२) भेट घेतली. यावेळी संदीप जोशी यांनी सफाई कर्मचा-यांच्या समस्या मांडल्या व कुलगुरूंना निवेदन दिले.
यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य विष्णु चांगदे, विनय कडू, बबलू बक्सारिया यांच्यासह इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येत सफाई कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे स्वच्छतेसाठी तीन एजन्सी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठ, कॅम्पसमधील विभाग, वसतीगृह आणि इतर कार्यालयांची स्वच्छता उत्तम व्हावी यासाठी खासगी एजन्सीला काम देण्यात आले आहे.
प्रति स्वच्छता कर्मचारी २०८८६ रुपये मासिक वेतन या दराने तिनही एजन्सीला विद्यापीठाद्वारे देयक दिले जाते. मात्र प्रत्यक्षात या तिनही एजन्सी सफाई कर्मचा-यांना केवळ ७ किंवा ८ हजार रुपये एवढेच वेतन देतात. एका कर्मचा-यामागे या एजन्सी १२ ते १३ हजार रुपये कमाई करते तर दुसरीकडे दिवसभर स्वच्छता कार्य करणा-या कर्मचा-यांना मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. किमान वेतन कायद्यानुसारही या कर्मचा-यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे या कर्मचा-यांना न्याय मिळावा यादृष्टीने विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांची भेट घेउन चर्चा केल्याचे यासंदर्भात बोलताना संदीप जोशी यांनी सांगितले.
कर्मचा-यांच्या हिताच्या दृष्टीने कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसादर दिलेला असून. शनिवारी १५ एप्रिल रोजी कुलगुरूंनी तिनही एजन्सींची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय न झाल्यास आक्रमक भूमिका घेउ, असा इशारा संदीप जोशी यांनी दिला.