नागपूर :- नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी (ता.२१) विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ ग्रहण केली. विधान परिषदेमध्ये त्यांनी गोपनियतेची शपथ ग्रहण केली. यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवनिर्वाचित आमदार संदीप जोशी यांचे अभिनंदन करुन स्वागत केले.
आमदार संदीप जोशी यांना गुरुवारी (ता.२०) विधान परिषद सदस्यत्वाचे प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन आभार मानले होते. आमदार म्हणून शपथ ग्रहण केल्यानंतर प्रतिक्रीया देताना संदीप जोशी म्हणाले, देश आणि समाजाप्रतीची नवी कर्तव्य, नवी जबाबदारी आज पक्षाने मला दिली. या महत्त्वपूर्ण जबाबदारीला मी न्याय देईन आणि माझ्या क्षेत्रातील, जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्यांचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी मी सदैव तत्पर असेन. पक्षश्रेष्ठींनी जो माझ्यावर विश्वास दाखवला अन् या जबाबदारीच्या पात्र समजले त्यासाठी मी गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक धन्यवाद करतो, असेही ते म्हणाले.