नागपूर : भारतीय क्रीडा प्राधिकरण (स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया) अर्थात ‘साई’च्या कामाचा सोमवारी (ता.२७) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला. ‘साई’च्या मुंबई क्षेत्र संचालक (रिजनल डायरेक्टर) सुष्मिता ज्योतसी यांनी सोमवारी नागपूरातील ‘साई’ केंद्राची पाहणी केली व यानंतर यासंबंधी मनपा मुख्यालयात महापौर दयाशंकर तिवारी यांच्याशी चर्चा करून माहिती दिली. यावेळी ‘साई’चे अभियंता दीनकर कुमार, केंद्राच्या कार्याचे समन्वयक आशिष बॅनर्जी उपस्थित होते.
नागपूर शहरामध्ये उदयोन्मुख खेळाडू आणि क्रीडा प्रशिक्षकांना मोठे व्यासपीठ मिळावे यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात प्रशिक्षण केंद्र व राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येत आहे. या संस्थेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘साई’ ला १४०.७७ एकर जमीन ३० वर्षासाठी लिजवर देण्यात आली आहे. नागपूर शहरातील क्रीडा धोरणाला प्रोत्साहन देणारी ही संस्था लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासंदर्भात महापौरांनी क्षेत्रीय संचालकांकडून कामाचा आढावा घेतला.
‘साई’च्या मुंबई क्षेत्रीय केंद्राच्या संचालिका सुष्मिता ज्योतसी यांच्याकडे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमन दिव या चारही प्रदेशांची जबाबदारी आहे.
नागपूर येथील ‘साई’ केंद्राच्या जागेमध्ये सुरक्षा भिंतीच्या बांधकाम कार्याला सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांना दिली. सुरक्षा भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या केंद्रामध्ये विविध उपक्रम आणि आयोजनांसाठी एक बहुद्देशीय सभागृह व १५० बेड्सच्या क्षमतेचे वसतीगृह तयार करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचेही सुष्मिता ज्योतसी यांनी सांगितले. या प्रकल्पांचे नकाशे सुद्धा त्यांनी यावेळी महापौरांना दाखविले व त्याबद्दल चर्चा केली.
‘साई’च्या संपूर्ण प्रकल्पाबाबत येत असलेल्या अडथळ्यांची माहिती देण्यात यावी व येथील कामांना गती प्रदान करण्यात यावी, अशी सूचना यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली.