स्मार्ट सिटी योजनेच्या कामांमध्ये वृक्षांच्या सुरक्षिततेला प्राधान्य – मंत्री उदय सामंत

मुंबई :- ठाणे शहरात स्मार्ट सिटी योजनेतंर्गत पारदर्शकतेने कामे सुरु असून येत्या काळात ठाणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. तसेच ठाणे महानगरपालिकेमार्फत शहरातील वृक्षांचे जतन करण्याची कटाक्षाने खबरदारी घेण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ठाणे शहरातील स्मार्ट सिटी योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांसंदर्भातील विधानसभा सदस्य सुनिल प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, ठाणे शहर क्षेत्रातील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत – पादचारी सुधारणा प्रकल्पाच्या माध्यमातून क्षेत्राधारित विकासांतर्गत एकूण 21 रस्त्यांवरील 23.40 कि.मी. लांबीच्या पदपथाच्या नूतनीकरणाचे काम माहे ऑक्टोबर, 2022 पूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी पदपथाचे रुंदीकरण, स्टॅम्प काँक्रिट व शहाबाद लादी पद्धतीने नूतनीकरण, स्ट्रिट फर्निचर, ट्राफिक साईनेजेस इ. कामे करण्यात आली असून या पदपथावर अस्तित्वात असलेल्या झाडांभोवतीची जागा सोडून आवश्यकतेनुसार ट्री-गार्ड किंवा वीट बांधकाम इ. संरक्षित करुन लाल माती टाकण्यात आली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल दावा क्र. 7/ 2015 मध्ये निर्गमित झालेल्या आदेशास अनुसरून ठाणे महानगरपालिका हद्दीतील वृक्षांच्या खोडाच्या सभोवतालचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण काढणे जेणेकरुन वृक्षाच्या मुळांना हवा व पाणी उपलब्ध होईल, या दृष्टीकोनातून 5 फेब्रुवारी, 2016 रोजी महानगरपालिका स्तरावर परिपत्रक निर्गमित केले आहे. तसेच वृक्ष उन्मळून पडण्याचे कारण निश्चित करण्याबाबतही चार सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून त्याच्या तांत्रिक अभिप्रायानुसार सिमेंट मुक्त / De-concretization करण्यात दि.31 मार्च 2018 अन्वये महानगरपालिकेने आदेश पारित केला आहे. या कार्यालये, इमारती इतर स्थावर मालमत्तेच्या जागेतील सर्व वृक्षांसभोवती 3 बाय 3 फूट जागा उपलब्ध करून ती सिमेंट मुक्त/De- concretization करणे इ. उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहेत.

तद्नंतर पुनःश्च आयुक्त तथा अध्यक्ष, वृक्षप्राधिकरण यांच्यामार्फत दि. 27 मार्च 2023 च्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येत असून माहे जुलै 2023 मध्ये सर्व प्रभाग क्षेत्रातील रस्त्यालगत असलेल्या वृक्षाचे सर्वेक्षण केले असून त्यामध्ये एकूण 7396 वृक्षाची नोंद घेण्यात आलेली आहे. या वृक्षांचे De-concretation करण्याबाबतचे काम महानगरपालिकेच्या स्तरावरून प्राधान्याने सुरु केले आहे.

तसेच ठाणे महानगरपालिका हद्दीत दि. 21 जुलै 2017 रोजी पाचपाखाडी परिसरात अंगावर झाड पडल्याने या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या किशोर उमाजी पवार यांच्या पत्नी श्रीमती प्रिती किशोर पवार यांना महासभेच्या ठरावानुसार ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्वाच्या धर्तीवर 2018 मध्ये लिपिक या संवर्गात तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदरचा ठराव विधीग्राह्य नसल्याने सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने दिनांक 10 ऑक्टोबर 2018 रोजी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४५१ (१) अन्वये निलंबित करण्यात आला असून पुढील कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. तसेच या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या ठराव क्रमांक ८३/१, दि.20 ऑक्टोबर 2020 अन्वये पारित केलेल्या व शासनास दिनांक 7 मे 2021 रोजी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर सद्यस्थितीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीन्वये कार्यवाही सुरू आहे. तसेच या प्रकरणी महानगरपालिकेने श्रीमती प्रिती पवार यांना विशेष बाब म्हणून महानगरपालिकेच्या आस्थापनेवर लिपिक पदी सद्यस्थितीत नियुक्ती दिली असल्याची वस्तुस्थिती असून त्यांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी पुन्हा येत्या पंधरा दिवसात शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल, त्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असेही मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान दि.9 सप्टेंबर 2022 रोजी कोलबाड परिसरात पिंपळ प्रजातीचा वृक्ष उन्मळून लगतच्या मंडपावर पडल्याने श्रीमती उर्मिला वालावलकर यांचा मृत्यू झाला आहे. अनुकंपा नियुक्ती तसेच कंत्राटी पध्दतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत शासनाने स्वयंस्पष्ट मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून उपरोक्त सूचनेचे पालन करणे सर्व विभागांना बंधनकारक आहे, असेही छापिल उत्तरात म्हटले आहे.

या लक्षवेधीवर विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, प्रताप सरनाईक, वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील झाई गावाच्या जमिनीवरील अतिक्रमणसंदर्भात पुढच्या आठवड्यात संबंधितांची बैठक घेणार - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Wed Jul 19 , 2023
मुंबई :- महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई, ता. तलासरी, जि. पालघर येथील गावातील स्थानिक प्रश्नांसोबतच मोजे वेवजी ता. तलासरी जि. पालघर व मोजे सोलसुंभा, ता. उंबरगाव, जि. बलसाड, गुजरात यांच्या सीमाहद्दीनिश्चिती कामासंदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितले. विधानसभा सदस्य विनोद निकोले यांनी विधानसभेत यासंदर्भातील उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com