संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22 :- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हा उदात्त हेतू समोर ठेवून पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्र शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या असून गाव परिसराचा कायापालट , विकास करावयाचा असेल तर लोकसहभाग असणे गरजेचे आहे असे आवाहन कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व खैरी ग्रामपंचायत चे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
समग्र गावाचा विकास करण्यासाठी शासनाच्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या सर्व योजनेची माहिती समस्त ग्रा प पदाधिकाऱ्यानी अवगत करणे गरजेचे आहे.कारण या योजना जनकल्याण व गावाच्या विकासासाठी असतात म्हणून म्हणून ग्रामपंचायत च्या सर्व पदाधिकाऱ्यांनो एकमेकांशी समनव्य साधून ग्रामसभेत या सर्व प्रकारच्या योजनेची महिती देऊन संपूर्ण नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे.
भारतीय संविधानात ग्रामविकासाला अनन्य साधारण महत्व दिले असून ग्रामविकासाच्या हेतूने तरतुदी केल्या आहेत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेत अभंगवाणीतून ग्रामविकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनीही कशाचीही तमा न बाळगता स्वता हातात खराटा घेऊन लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधित केले आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी संतांचे विचार अंगीकृत करून आचरणात आणले पाहिजे.
ग्रामस्वछता अभियानात सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रथम व्यक्तिक स्वछतेसह घर व परिसराची स्वछता केली पाहिजे.कचऱ्याची सुका व ओला कचरा अशी विभागणी करून कचरा रस्त्या वाटेवर न टाकता कचरा कुंडीत टाकावे, तसेच कचरागाडीत टाकावे , घराशेजारी व दुतर्फा आणि पडीत जागेवर विविध प्रकारच्या रोपट्याचे वृक्षारोपण करावे , गावात सामाजिक सलोखा ,कायदा, शांतता व सुरक्षितता कायम राखणे अशी कामे ग्रामपंचायत व नागरिकांच्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे.यासाठी ग्रामपंचायत च्या समस्त पदाधिकाऱ्यांनी गावातील संपूर्ण नागरिकांना विश्वासात घेऊन ग्रामविकासासाठी लोकांचा सहभाग करून घेणे गरजेचे आहे तसेच लोकसहभागाशिवाय ग्रामविकास साधता येऊ शकत नसल्याचे मत सरपंच बंडू कापसे यांनी व्यक्त केले.