शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
नागपूर : कोविड महामारीनंतर प्रथमच पहिली ते चवथीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण भागातील शाळेत पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गौंडखैरी येथे भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
नागपूर जिल्ह्यातील कोविड प्रोटोकॉल पाळत इयत्ता 1 ते 4 पर्यंत वर्गाची सर्व शाळांची सुरुवात आजपासून झाली. आज ग्रामीण भागातील 13 तालुक्यातील 2021 शाळांपैकी 1898 शाळा सुरु झाल्या आहेत. ग्रामीण भागात 1 लाख 28 हजार 91 विद्यार्थी असून त्यापैकी 64 हजार 780 विद्यार्थी आज उपस्थित होते. तर 5 हजार 956 पैकी 5 हजार 569 शिक्षक उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका वगळून शहरीभागातील इयत्ता 1 ते 7 च्या सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. इयत्ता 1 ते 7 च्या 287 शाळेपैकी 251 शाळा सुरु झाल्या असून 52 हजार 661 विद्यार्थ्यांपैकी 17 हजार 774 विद्यार्थी उपस्थित होते. तर 2 हजार 203 शिक्षकांपैकी 1 हजार 549 शिक्षक शाळेत उपस्थित होते.
नागपूरातील शाळांबाबत 10 डिसेंबरला निर्णय
कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता 1ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास 10 डिसेंबर 2021 पर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन 10 डिसेंबर नंतर याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येईल.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता. 30) यासंबधीचे आदेश जारी केले आहे. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.
महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मनपा आयुक्तांनी कोरोना विषाणुची परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरु करण्याचा निर्णयावर स्थगिती दिली आहे. मंगळवारी निघालेल्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र या वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.