नागपूर :- ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये ३० जानेवारी कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडयामध्ये विविध प्रकारचे आरोग्य शिक्षण उपक्रम विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. यामध्ये रन फॅार लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन फ्रीडम पार्क येथे करण्यात आले आहे.
मॅरेथॅानमध्ये तीन वयोगट असणार आहेत. १८ ते ३० वर्षे वयोगट, ३० ते ४५ वर्षे वयोगट आणि ४५ पेक्षा जास्त वयोगट असणार आहेत. यात स्त्री व पुरुषांचा समावेश असणार आहे. मॅरेथॉन दौड मधील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रम प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकानुसार बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत कार्यक्रम प्रश्न मंजुषा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्वचा रोग शिबिरे, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकरीता कार्यशाळा, पथनाट्याचे आयोजन ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या पंधरवड्यामध्ये करण्यात आलेले आहे. वरील स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे यंदाचे घोषवाक्य हे कलंक कुष्ठऱोगाचा मिटवू या, सन्मानाने स्वीकार करूया, असे आहे.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात दिनांक २० नोव्हेंबर ते ६ डिसेबर २०२३ या कालावधित जिल्हयात कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात आले असून या अभियानात निवडक लोकसंख्येत प्रत्यक्ष तपासणी करण्यात येऊन एकूण १४५७५ संशयित रुग्ण शोधण्यात येऊन त्यापैकी १४५६० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये नागपूर जिल्हयात १२६ सांसर्गिक व १८१ असांसर्गिक असे एकूण ३०७ नवीन रुग्ण शोधण्यात येऊन त्यांना उपचाराखाली आणण्यात आले. यामध्ये एकूण १० बालकांचा समावेश आहे तसेच नागपूर जिल्हयात माहे एप्रिल ते डिसेंबर २०२३ अखेर एकूण ७०० नवीन रुग्ण शोधण्यात आलेले असून त्यांना उपचाराखाली आणण्यात आलेले आहे.
२६ जानेवारी रोजी ध्वजारोहणानंतर ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रा.आ.केंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, नगरपालिका दवाखने, महानगरपालिका दवाखाने, इतर विभागाची शासकीय, निमशासकीय कार्यालये,, शाळा, महाविदयालये, आश्रमशाळा, अंगणवाडी येथे कुष्ठरोगाविषयीची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला सहायक संचालक कुष्ठरोग डॅा. राजकुमार गहलोत, वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॅा. बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॅा. साकोरे, डॅा. साजिया, डॅा. सिद्दीकी, डॅा. बांगर आदी उपस्थित होते.