जागतिक आर्थिक धोरण आखतांना नागरिकांच्या अपेक्षा प्रतिबिंबीत करण्याची महत्वपूर्ण भूमिका सिव्हिल सोसायटी ऑर्गनाजेशन्स अर्थात नागरी समाज संस्था (सी-20) ‘जी-20’ समुहामध्ये पार पाडते. हा गट आर्थिक हितसंबंध आणि नागरिकांचे हित यांच्यात संतुलन राखण्यात मदत करतो. त्याअनुषंगाने नागपूर येथे येत्या 21 व 22 मार्च रोजी आयोजित या सिव्हील-20 गटाच्या प्रारंभिक परिषदेला विशेष महत्व आहे.
नागरी समाज या संकल्पनेनुसार देशातील प्रत्येक व्यक्ती नागरी समाजाचा घटक आहे. नागरिकांच्या हितासाठी कार्यरत शासकीय आणि खाजगी या दोन क्षेत्राशिवाय उर्वरित समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांचा समावेश नागरी समाज संस्थांमध्ये होतो. यात सामाजिक कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक चळवळी तसेच सत्तेत नसलेल्या राजकीय संस्थांचा समावेश आहे.
जी-20 मध्ये नागरी समाज संस्थांच्या सहभागाची सुरुवात 2010 मध्येच झाली होती. मात्र जी-20 चा यंगेजमेंट गृप म्हणून सी-20 ची अधिकृत स्थापणा 2013 मध्ये करण्यात आली. ‘सी-20’ हा गट सामाजिक विकास, मानवी हक्क आणि लैंगिक समानता यासह विविध विषयांवर जागतिक धोरणे आखण्यासाठी जी-20 ला शिफारशी देतो. जगभरातील अशासकीय व सेवाभावी नागरी समाज संस्थांचे म्हणणे मांडण्यासाठी सी-20 हा हक्काचा जागतिक मंच आहे.
सी-20 गट जागतिक चारित्र्य, पारदर्शकता, स्वातंत्र्य, सहयोग, मानवी हक्क, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण या तत्त्वांवर कार्य करतो. सी-20 चे मुख्य कार्य सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि जागतिक आर्थिक धोरणे आखतांना त्यात नागरिकांच्या अपेक्षांचा पाठपुरावा करण्यासाठी शिफारशी करण्याचे आहे.
नागरी समाज संस्कृती आणि सी-20 चे उद्दिष्ट्य
महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, ईश्वरचंद्र विद्यासागर आदि समाजसुधारकांनी देशातील नागरी समाज संस्कृतीला आकार देण्याचे महनीय कार्य केले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात हीच परंपरा पुढे नेत आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो कर्वे, बाबा आमटे, आणि सुंदरलाल बहुगुणा आदिंनी नागरी संस्थांचा आवाज बुलंद केला. ‘जगातील कोणीही व्यक्ती विकासप्रक्रीयेत मागे राहू नये’ या दृष्टीकोनातून सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
जगप्रसिद्ध मानवतावादी आणि आध्यात्मिक धुरीण तथा केरळ राज्यातील माता अमृतानंदमयी मठाच्या संस्थापिका अमृतानंदमयी ऊर्फ अम्मा यांची यावर्षीच्या सिव्हील सोसायटीच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात झाली आहे.
बोधचिन्ह
‘आशा, स्वयंप्रेरणा आणि निःस्वार्थ सेवेच्या ज्योती’ हे सी-20चे बोधचिन्हाचे प्रतिक आहे. बोधचिन्हावर “तुम्हीच प्रकाश आहात” (YouAreTheLight) हे घोषवाक्य आहे. नागरी समाजातील प्रत्येक सदस्याला एकत्र येण्यासोबत स्वतःचा मार्ग तयार करणे आणि सामूहिक प्रयत्नातून समस्यांचे निराकरण करण्याचा संदेश या बोधचिन्हातून प्रतिबिंबित होतो. देशात होऊ घातलेल्या सी-20 परिषदेसाठी सचिवालयाची जबाबदारी मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सांभाळत आहे.
परिषदेचे लाभ
निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासोबतच नागरी समाजाचे बळकटीकरण करण्यासाठी ही परिषद महत्वपुर्ण भूमिका बजावत आहे. त्यामुळे जी-20 ला ध्येय निश्चित करण्यासाठी नागरी समाजाच्या कौशल्याचा लाभ होतो. निर्णय प्रक्रियेत अप्रत्यक्षरित्या सामान्य नागरिकांचा आवाज आणि दृष्टीकोन विचारात घेतला जात असल्यामुळे जी-20 चे विकासात्मक प्रभावी धोरण निर्माण होण्यास मदत होते.
यजमान शहराला लाभ
आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आदान-प्रदाणाचे केंद्र म्हणून जगापुढे सादर करण्याची संधी नागपूर शहराला या परिषदेमुळे प्राप्त होणार आहे. नागपूर व लगतच्या विभागातील विपुल वनसंपदा, खनिजसंपदा, वन्यजीव, जैवविविधता, गड-किल्ले, खाद्यसंस्कृती, विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे, वीज व पाण्याची मुबलकता, आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या सोयी-सुविधा, देश-विदेशातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. या क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या सामाजिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडून नवीन भागीदारी, सहयोग आणि अर्थिक गुंतवणूकीची संधी निश्चितच निर्माण होतील. यासर्वांमुळे नागपूर येथे आयोजित होत असलेल्या या परिषदेला विशेष महत्व आहे.
– गजानन जाधव
माहिती अधिकारी ,माहिती व जनसंपर्क, नागपूर